- उदय कळसम्हसळा : सेरेब्रल पाल्सी या असाध्य रोगाने ग्रस्त १६ वर्षीय हृषीकेश माळी या म्हसळा येथील ए.आय.जे. या कॉलेजमध्ये ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नुकताच रायगड किल्ला चढून सर्व दिव्यांगांना प्रेरणा दिली आहे. एक अवघड आणि अशक्य वाटणारे दुर्गारोहण त्याने आपल्या जिद्द, चिकाटी व दुर्दम्य महत्त्वाकांक्षेतून, अथक प्रयत्नांची जोड देऊन पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीतही उच्च ध्येय गाठता येते हे हृषीकेशने सिद्ध करून दाखवले.‘माउंट एव्हरेस्ट’ सर करणाºया पहिल्या महिला दिव्यांग ‘अरुणिमा सिन्हा’ यांचा आदर्श घेऊन अथांग पसरलेल्या, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, अभेद्य गिरीशिखरावरील ‘दुर्ग दुर्गेश्वर रायगड’ चढून जायची आकांक्षा इयत्ता दहावीमध्ये असतानाच हृषीकेशच्या मनात निर्माण झाली. किल्ला सर करताना कुठेही न थांबता, न थकता हे उच्च ध्येय त्याने गाठले. पाचाड येथे जाऊन राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळास नमन करून व आशीर्वाद घेऊन हृषीकेशने या गिरीभ्रमणास प्रारंभ केला. समुद्रसपाटीपासून २,८५१ फूट उंच असलेल्या या गडावर जाण्यासाठी सूर्यदेवतेची वाट न पाहता ‘खुबलढा’ बुरुजापासून प्रेरणा घेत, गडावरीलकडे कपाऱ्यांना वंदन करत, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी या स्फूर्तिदायी घोषणा देत, हृषीकेशने आगेकूच केली. शिरकाई देवीचे दर्शन घेत, अवघ्या अडीच तासांत सूर्याबरोबरच त्याला सूर्यासम तेज असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घडले. महादरवाजा, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणादरवाजा, राजभवन, राणीमहल, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ येथील हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा सुवर्णाक्षरांनी लिहिलेला शिवइतिहास जाणून घेतला.गड सर करताना शिवभक्त ऋतुजा घरफाळकर (अमरावती), शिवप्रसाद वाघमारे (उस्मानाबाद), संजय लव्हाळे (बीड), मित्र कैलास कदम, हृषीकेश सूर्यवंशी (वाशी) प्राध्यापक वर्ग दयानंद कॉलेज पुणे यांनी तसेच जय मल्हार हिरकणीवाडी रायगड व लामजे बंधू पाचाड रायगड, तसेच रायगड चढणाºया शिवप्रेमींनी हृषीकेशच्या जीद्द व धाडसाला सलाम करत त्याला प्रेरणा दिली. हृषीकेशने रायगड मोहीम ‘सर’ केल्याबद्दल दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार व रायगड जिल्हा सचिव शिवाजी पाटील. समीर बनकर, रमेश शेठ जैन, बाळ करडे, मंगेश मुंडे, प्रदीप कदम, नारायण शेठ राजपूत, दिलीप कांबळे, प्रवीण बनकर, सचिन करडे, मुकेश जैन, म्हसळा पंचायत समितीचे सभापती उज्ज्वला सावंत, उपसभापतीमधुकर गायकर, गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांनी अभिनंदन केले.>जन्मानंतर चार वर्षांपर्यंत हृषीकेश ९० टक्के दिव्यांग होता. दिव्यांग मुलांना केवळ घरात न ठेवता त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कला, छंद व आवड जोपासण्यास मदत करा, जग दाखवण्याचा प्रयत्न करून त्यांचे मन सक्षम बनवा, असा संदेश हृषीकेशची आई शीतल सुदाम माळी यांनी दिव्यांग मुलांच्या पालकांना दिला.
कौतुकास्पद! दिव्यांग हृषीकेशने केला ‘रायगड’ किल्ला सर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 12:29 AM