दिव्यांगांनी केली रायगड किल्ल्याची चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:04 AM2018-12-03T00:04:01+5:302018-12-03T00:04:05+5:30
इच्छाशक्तीपुढे निसर्गालाच आव्हान देण्याचे काम शनिवारी मुंंबईतील ५५ दिव्यांगांनी केले.
- जयंत धुळप
अलिबाग : इच्छाशक्तीपुढे निसर्गालाच आव्हान देण्याचे काम शनिवारी मुंंबईतील ५५ दिव्यांगांनी केले. बेलाम रायगड किल्ला पायी चढून त्याची भ्रमंती करण्याचे साहस जुहूच्या रोटरी क्लब आणि फिनिक्स फाउंडेशनच्या दिव्यांग मित्रांनी जागतिक अपंग दिनाच्या पूर्वसंध्येला केले.
मुंबईहून शनिवारी सकाळी दिव्यांगांचा चमू रायगडकडे रवाना झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे रायगडच्या पायथ्याशी पोहोचण्यास त्यांना संध्याकाळ झाली. सायंकाळी ४ वाजता रायगड किल्ला नाणेदरवाजापासून त्यांनी किल्ला चढायला सुरूवात केली. कोणी कुबड्या घेऊन तर कुणी दोन्ही हातात काठ्या घेऊन असे पन्नासएक दिव्यांग रायगड चढत होते. सुटीचा वार असल्याने पायवाटेवर गर्दीही होती. सर्वसामान्य माणसाला गड चढताना धाप लागते, मात्र या दिव्यांगांची हिंमत पाहून अनेक जण अवाक् झाले. रविवार संपूर्ण दिवस दिव्यांगांनी इतिहास अभ्यासक संजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडभ्रमंती केली.
जय शिवाजी, जय भवानीचा जयघोष करीत चढाई सुरू केल्याने, गड चढताना कोणताही त्रास झाला नसल्याची प्रतिक्रिया गुडघ्यापासून सळई बसवलेल्या विनोद रावत यांनी दिली.
गेली अठरा वर्षे फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील साहसी भ्रमंतीत दिव्यांगांना सहभागी करण्याचे धाडस केले जात आहे. कळसूबाईचे शिखर, अनेक सुळके, लोहगडासारखे अवघड किल्ले यापूर्वी अशा दिव्यांगांनी सर केले आहेत. या साहसी उपक्र माचे महाडचे आमदार भरत गोगावले यांच्याकडूनही कौतुक करण्यात आले.