दिवाळीची सुट्टी समुद्रकिनाऱ्यावर, रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मौज-मस्ती
By राजेश भोस्तेकर | Published: October 25, 2022 03:27 PM2022-10-25T15:27:17+5:302022-10-25T15:30:25+5:30
जिल्ह्यात समुद्र पर्यटनासह प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची गर्दी
अलिबाग : दिवाळी सुट्टी पडली असल्याने वन डे पिकनिकसाठी पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्यात वळली आहेत. जिल्ह्यातील समुद्र किनारे, प्रेक्षणीय स्थळे, गड, किल्यावर पर्यटकांची धूम मस्ती पाहायला मिळत आहे. मात्र दरवर्षी पर्यटकांची होणारी गर्दीला खडयामुळे ब्रेक पडला असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. मात्र आलेले पर्यटक हे समुद्रकिनारी धमाल मस्ती करण्यात गुंग झाली आहे.
मुलांच्या परीक्षा संपल्या असून शाळेने दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे अनेकांनी विविध ठिकाणी पर्यटनाला जाण्याचा बेत केला आहे. रायगडमध्ये पर्यटनाला अधिक पसंती पर्यटकांची असते. त्यामुळे सुट्टी पडली की मुंबई, पुणे, ठाणे तसेच इतर राज्यातील पर्यटक रायगड पर्यटनासाठी येत असतात. दिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्याला लागून असलेल्या शहरी जिल्ह्यातून वन डे पिकनिकसाठी पर्यटक अधिक येऊ लागलेले आहेत.
जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, काशीद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी झालेली आहे. समुद्र स्नान सोबत जलक्रीडा प्रकारचा आनंद पर्यटक लुटत आहेत. त्याचबरोबर घोडा, उंट, एटीव्ही बाईक, सायकल या सवरीचा आनंदही लुटत आहेत. पर्यटक आले असल्याने समुद्र किनारी व्यवसाय करणाऱ्यांनाही याचा लाभ झाला आहे. हॉटेल रिसॉर्ट, कॉटेज व्यवसायिक यांनाही बुकिंग मिळालेली आहे. मात्र दरवर्षी होणारी रुमची हाऊसफुल बुकिंग यंदा मात्र कमी असल्याचेही चित्र आहे.
समुद्र पर्यटनसह गड, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे, थंड हवेचे ठिकाण माथेरान, महड, पाली अष्टविनायक या धार्मिक स्थळांवरही पर्यटकांची गर्दी झालेली आहे. जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे वाहनाची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही उद्भवत आहे. मात्र दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात सध्या पर्यटकांची धूम मस्ती सुरू आहे.