माथेरान : सर्वांनाच प्रतीक्षा असलेली माथेरानच्या मिनी ट्रेनची सेवा शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. हारतुरे परिधान केलेल्या ‘राणी’चे आगमन माथेरान स्थानकात होताच तिचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले. सकाळी नऊ वाजता नेरळ स्थानकातून ही मिनी ट्रेन निघाली होती, ती माथेरान स्थानकात एक वाजता पोहोचली. शनिवारी पहिल्याच दिवशी या मिनी ट्रेनमधून ९६ प्रौढ तर पाच लहान मुले, अशा १०१ प्रवाशांनी प्रवास केला. पावसाळी काळात ही सेवा बंद करण्यात आली होती. ती अद्याप सुरू करण्यात आली नव्हती. नेहमीच्या वेळेपेक्षा २० दिवस उशिराने प्रवाशांच्या सेवेत ती आली आहे. दिवाळी सुट्या लागणार असल्याने माथेरानला पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विस्टाडोम आणि प्रथम श्रेणीकरिता तिकिटासाठी स्वतंत्र रांग असणार आहे. या गाडीसाठी अद्यापही आरक्षण होत नसल्याने गाडी सुटण्यापूर्वी पाऊणतास अगोदरच प्रत्येक प्रवाशांना केवळ चार तिकिटे उपलब्ध होऊ शकतात, असे रेल्वेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मिनी ट्रेन सुरू झाल्यामुळे पर्यटनात वाढ होणार आहे. सध्या दोन फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्या पर्यटकांच्या दृष्टीने अपुऱ्या असून, सर्व पर्यटकांना याचा लाभ घेता येऊ शकत नाही, त्यासाठी फेऱ्या वाढवाव्यात. - जनार्दन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते, माथेरान
आजच्या पहिल्याच दिवशी आम्ही या ट्रेनची सफर आमच्या कुटुंबासोबत आनंदाने केली. डोंगरदऱ्यातील निसर्गसौंदर्य न्याहाळता आले. खूपच मस्त अनुभव आला होता. गाडी खूपच हळूहळू चालते. त्यामुळे तीन तासांहून अधिक वेळ लागतो. वेग वाढवल्यास वेळेचे बचत होईल व लवकरच माथेरानला पोहोचता येईल. - नित्यनाथ कासारे, पर्यटक