रोजगार हिरावल्याने दिवाळी साजरी केली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:56 AM2020-11-21T00:56:11+5:302020-11-21T00:56:17+5:30
पनवेलमधील ओएनजीसी आदिवासी वाडी, बच्चेकंपनीसाठी पालकांनी केली फटाके खरेदी
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : लॉकडाऊनच्या काळात रोजंदारीवरील रोजगार हिरावले. सहा ते सात महिने घरात बसून काढले. अशावेळी दिवाळी तरी कशी साजरी करणार? घरात पुरेसे सामान नसल्याने दिवाळी साजरी करणे टाळल्याची खंत पनवेलमधील ओएनजीसी आदिवासी वाडीतील रहिवासी गणेश नाईक यांनी व्यक्त केली.
घरातील लहान मुले फटाके, रोषणाई करण्यासाठी आग्रह करीत होते. त्यांच्याकरिता फटाक्यांचा बॉक्स सोडल्यास इच्छा असूनही दिवाळी साजरी केली नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. मंगेश व त्यांचे वडील गणेश नाईक हे खेळपट्टी तयार करतात. लॉकडाऊनपूर्वी एका गोदामात दोघेही रोजंदारीवर काम करायचे, मात्र कोरोनामुळे हे काम बंद झाले. इतर वेळेला कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी येते. अशावेळी आमच्या मदतीला कोणीच आले नसल्याचे मंगेश नाईक यांनी सांगितले. गरिबांना सर्व दिवस सारखेच, अशा भावना मंगेशने व्यक्त केल्या.
मुलांचा आग्रह मोडवेना
आपली परिस्थिती काय आहे याची जाणीवही त्या लहानग्यांना नसल्याने लहान मुलांच्या आग्रहास्तव फटाक्यांचा एखादा बॉक्स जीवावर उदार होऊन आम्ही खरेदी केला असल्याचे ओएनजीसी आदिवासी वाडीत झोपडीत राहणारे मंगेश नाईक यांनी सांगितले.
मोजकेच फटाके फोडून आनंद
मुलांनी केलेल्या आग्रहामुळे मोजकेच फटाके फोडून हा दिवाळी सण साजरा केला. या आनंदात दरवर्षीसारखी मज्जा नव्हती मात्र लहानग्यांच्या आग्रहास्तव पालकांनी त्यांची हौस पूर्ण करण्याचा यातून प्रयत्न केला.
कोरोनामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी सर्वांनीच एकमेकांकडे जाण्याचे टाळले. या काळात आम्ही तर बेरोजगार झालो आहोतच, पण हा फटका अद्यापही भरून निघाला नाही. सध्याच्या घडीला आमच्यासह वाडीतील अनेक जण बेरोजगार आहेत. हाच दीर्घकाळीन परिणाम आम्हाला भोगावा लागत आहे.
दिवाळीत बाहेरच पडता आले नाही
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी दिवाळी या वर्षी आम्ही घरातच बसून काढली, असे चिमुरड्या शैलेश नाईकने सांगितले. दरवर्षी प्रमाणे गोडधोड फराळदेखील बनविला गेला नाही. दरवेळी आई- बाबा दिवाळी आली की उत्साहात असतात. यावेळी कोरोनामुळे त्यांनाही काही करता आलेले नाही. त्यांनी आमचा फटाक्यांचा हट्ट पूर्ण केला.