पनवेल महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकालाच डेंग्यू ; शहरात साथीच्या आजारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:52 AM2018-08-04T03:52:07+5:302018-08-04T03:52:17+5:30
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये तापाच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. आसूडगावमध्ये एक मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांच्यावर खासगी रुणालयात उपचार सुरू आहेत.
- वैभव गायकर
पनवेल : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये तापाच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. आसूडगावमध्ये एक मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांच्यावर खासगी रुणालयात उपचार सुरू आहेत. साथीचे आजार वाढू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पनवेल शहरात अनेक ठिकाणी उघडी गटारे, तसेच रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. पनवेल बस आगारासमोर देखील मलनि:सारणचे पाणी वाहत होते. पनवेल तालुक्यात २३00 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढत होत आहे. पाऊस थांबताच साथीच्या आजारात वाढ होत आहे. पनवेल महानगर पालिकेच्या मार्फत साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली होती.
डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. एडीस एजिप्टाय डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळीच योग्य उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकत असला तरी रु ग्णाने आपल्या आरोग्याची निगा घेताना थोडेजरी दुर्लक्ष केल्यास या आजारामुळे रुग्णाला आपला प्राणही गमवावा लागू शकत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पनवेल शहरातील नागरिकांना आरोग्याचे धडे देणाºया पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनाच डेंग्यूसदृश आजाराची लागण होत असेल तर नागरिकांचा आरोग्य प्रश्न रामभरोसेच असल्याचे बोलले जात आहे.
पालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांची डेंग्यू आजाराचे निदान करण्यासाठी केली जाणारी एनएसआय टेस्ट ही पॉझिटिव्ह आल्याचे बोलले जात आहे. शहरातील नामांकित गुणे रु ग्णालयात ते उपचार घेत आहेत. पालिकेच्या मार्फत ठिकठिकाणी जरी धुरीकरण, फवारणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शहरातील व्याप्तीनुसार ही यंत्रणा तोकडी पडत आहे. ग्रामीण भागात तर परिस्थिती आणखीनच बिकट आहे. २२ जुलैला आसूडगाव येथे मनीष शिवनाथ शहा या १५ वर्षांच्या मुलाचाही डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाला होता. साथीचे आजार आटोक्यात आणण्यास महापालिकेला अपयश येऊ लागले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पालिकेच्यावतीने धुरीकरण व औषध फवारणी केली जात असली तरी त्याचे प्रमाण कमी असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ
सध्याच्या घडीला पनवेल शहरात सर्वात जास्त डेंग्यूच्या रु ग्णांची संख्या आहे. कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल या तीन शहरांत ११३ रु ग्णालये, नर्सिंग होम या ठिकाणी पॅथॉलॉजी सर्व्हिसेसने केलेल्या सर्व्हेनुसार प्रत्येक रुग्णालयात किमान १० ते १२ टक्के डेंग्यूसदृश रु ग्णांचा समावेश असल्याचे या पॅथॉलॉजीचे संचालक मंगेश रानवडे यांनी सांगितले. त्यानंतर पोटाच्या विकारांमुळे अथवा खराब पाण्यामुळे होणाºया आजारांची संख्या जास्त आहे. गॅस्ट्रो, कॉलरा व कावीळ या रु ग्णांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे, या वर्षी मलेरियाच्या रु ग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असल्याचे रानवडे यांनी सांगितले.
काय उपाययोजना राबवावी?
कीटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पावसाचे पाणी घराच्या आवारात साचू देऊ नये. शिवाय सांडपाणी वाहते करावे, तर वापरण्यासाठी साठविलेले पाणी नेहमी झाकून ठेवावे. इतकेच नव्हे तर आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळावा. असे केल्यास कीटकजन्य आजाराच्या प्रादुर्भावाला अटकाव घालता येतो. तसेच नागरिकांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर केल्यास ते फायद्याचे ठरत असल्याचे सांगण्यात आले. ताप आल्यास कुठलाही घरगुती उपाय न करता, वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे.
आरोग्य निरीक्षक हे वैद्यकीय रजेवर आहेत. त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे की नाही, यासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, डेंग्यूच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन तपासणी करणार आहोत. नागरिकांनीही आपल्या घरात व घराजवळ डेंग्यूच्या डासांची पैदास होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
-जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका