अलिबाग : मराठी भाषा जगण्यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत आहेत. भाषा स्वत:च समृद्ध आहे, त्यामुळे तिच्या निर्मितीमध्ये बाधा आणल्यास तिचे मरण सुरू होते, असे परखड विचार चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. मराठी भाषा बोलताना तिच्या शुद्ध-अशुद्ध बोलण्याकडे म्हणजेच भाषेमध्ये व्याकरणाची दहशत नसावी, असे त्यांनी स्पष्ट केले.जागतिक मराठी अकादमी, पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ आणि सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शोध मराठी मनाचा २०२० हे १७ वे जागतिक संमेलन अलिबाग येथे सुरू आहे. त्याचे उद्घाटन संमेलानाध्यक्ष नागराज मंजुळे यांच्या हस्ते मंगळवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात ७ ते ९ जानेवारी असे सलग तीन दिवस हे संमेलन होणार आहे.ग्रामीण भागामध्येच खऱ्या अर्थाने भाषा जिंवत आहे. कारण तेथे ती समृद्ध आहे. आपल्याला मल्याळम, तेलुगू, तामिळ, आगरी, कोकणी भाषा बोलता येत नाहीत. त्याचा आपल्याला न्यूनगंड नाही. मात्र, इंग्रजी आले नाही की न्यूनगंड येतो. भाषा कौशल्य नाही तर संवादाचे उत्तम माध्यम असले पाहिजे. शिक्षण, ज्ञान आणि भाषा यामध्ये आपण गल्लत करत आहोत. मराठी बोलण्याचा आत्मविश्वास सर्वांनाच दिला पाहिजे तर मराठी भाषेचा प्रचार होईल, म्हणूनच यामध्ये बदल झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी अकादमीचे उपाध्यक्ष के. डी. पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, सरचिटणीस राजीव मंत्री, विद्या जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रसाद कांबळी, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील आदी उपस्थित होते.>दिनकर गांगल यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कारमराठी माणसांनी जगभरात चांगला नावलौकिक मिळवत मराठी भाषेचा झेंडा साता समुद्रापार नेला आहे. अशा विभूतींचा सत्कार संमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये ग्रंथाली प्रकाशनचे संपादक दिनकर गांगल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर तंबाखूविरोधी कार्यक्रम राबवून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे डॉ. अनिल नेरुरकर यांना जागतिक भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच याच वर्षी प्रथमच कार्यकर्ता पुरस्कार देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. २०२० चा कार्यकर्ता पुरस्कार हेमा राजमाले (अमेरिका) यांना देण्यात आला.>मराठी भाषा बोलणे, लिहिणे बंद झाले, तर मराठी चित्रपट, नाटक, कथा, कांदबºया, साहित्य यांची निर्मिती कशी होणार, असा सवाल जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी केला. प्रत्येक देशातील मराठी व्यक्ती संमेलनामध्ये आल्या पाहिजेत. यासाठी परदेशातील मराठी माणसांची नाळ जोडण्याचे काम अकादमी करत असल्याचे ते म्हणाले.
मराठीत व्याकरणाची दहशत नको- नागराज मंजुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:34 AM