अलिबाग - आरोग्य आणि शिक्षण सुविधा यात तडजोड होता काम नये. आज रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम होण्यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून रायगड मेडिकल असोसिएशनने पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भरत बास्टेवाड यांनी येथे केले.
रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग-रायगड मेडिकल असोसिएशन आणि चित्पावन आठवले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (3 मे) जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन प्रसंगी डाॅ. भरत बास्टेवाड बोलत होते. सकाळी 11 वाजता नर्सिंग काॅलेज येथे प्लास्टीक सर्जरी शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. शीतल जोशी-घुगे, प्लास्टीक सर्जन डाॅ. नितीन मोकल, डाॅ. स्वप्ना आठवले, चित्पावन आठवले फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल आठवले, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. निशिगंध आठवले, कार्यवाह डाॅ. राजेंद्र चांदोरकर, खजिनदार डाॅ. नवलकिशोर साबू,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते एक बालरुग्णाला गुलाबपुष्प व भेटवस्तु देऊन शिबिराचे उद्घाटन झाले.
मार्गदर्शन करताना डाॅ. भरत बास्टेवाड म्हणाले की, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अंबादास देवमाने यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा पदभार घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या पडझड होणाऱ्या इमारतीवर चांगल्या प्रकारे काम सुरू केले आहे. जिल्हा रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा वाढण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे रुग्णांना अधिकाधीक सुविधा मिळू लागल्या आहेत. जिल्ह्यात आदिवासी बहुल भाग जास्त आहे, तेथे आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. येथे येणारे नवीन एमबीबीएस डाॅक्टर जास्त दिवस रहात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात डाॅक्टरांची कमतरता आहे. रायगड मेडिकल असोसिएशनने जिल्हा रुग्णालय व विविध संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात काम करावे, असे आवाहन डाॅ. बास्टेवाड यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देणारे अलिबागमधील खाजगी डाॅक्टर, प्लास्टीक सर्जन डाॅ. नितीन मोकल यांच्या कार्याचे डाॅ. बास्टेवाड यांनी काैतुक केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अंबादास देवमाने, डाॅ. शीतल जोशी-घुगे, डाॅ. नितीन मोकल यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. राजेंद्र चांदोरकर यांनी केले. या प्लास्टीक शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास डाॅक्टर, परिचारिका, रुग्ण आदी उपस्थित होते.