रोहा : कुंडलिकेच्या पात्रात माती भराव करू नका, नदीचे पात्र अरु ंद करू नका, नदीच्या पावसाळी प्रवाहाला बाधित करणारा आणि धोकादायक असलेला माती भराव त्वरित काढून टाका या मागणीसाठी रोहेकर सोमवारी रस्त्यावर उतरले होते. नदीचे पात्र वाचविण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी रोहा नगरपलिकेला कुंडलिका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून दीडशेहून अधिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
रोहेकरांची जीवनदायिनी असलेल्या कुंडलिका नदीत संवर्धनाचे काम सुरू असून त्यासाठी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून आणि बांधकाम करून नदीचे पात्र अरुंद केले जात आहे. परिणामी कुंडलिका नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले आहे. रोह्याला अनेकदा महापुराचे मोठे फटके बसलेले आहेत. दर वर्षी पावसाळ्यात रोहा अष्टमी, भुवनेश्वर, वरसे, रोठसह परिसरात पुराचे पाणी शिरते. माती भरावामुळे पुलाचे गाळे सुद्धा कमी होताना दिसत आहेत. शिवाय पात्रात दोन्ही किनारी सिमेंटच्या भिंती तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे नदीपात्र बंदिस्त होणार आहे. यामुळे पावसाळी पूर आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कळसगिरीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह पात्रात घेण्याची नदीची क्षमता संपुष्टात येणार आहे. पावसाळ्यात निर्माण होणारी ही परिस्थिती पहाता नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल असे कोणतेही काम करु नये. त्याचबरोबर पूररेषेत होत असलेल्या या भराव तातडीने थांबण्यात यावा तसेच पूररेषेत कोणतेही नियमबाह्य बांधकाम करु नये या मागणीसाठी रोहेकरांनी शहरातील राम मारु ती चौक ते रोहा नगर परिषद दरम्यान भव्य रॅली काढली होती.
या रॅलीचे नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, सामाजिक कार्यकर्ते अप्पा देशमुख, अॅड. मनोजकुमार शिंदे, संतोष खटावकर, सुरेश मगर, राजेंद्र जाधव, अॅड. हर्षद साळवी यांनी केले. तर माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, संदीप तटकरे, अरविंद जैन, नीता हजारे, नगरसेविका समीक्षा बामने, स्वरांजली शिर्केआदिंनी उपस्थित राहून या लोक चळवळीस सक्रि य पाठिंबा दर्शविला. नगरपालिकेच्या आवारात येताच रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी अॅड. मनोजकुमार शिंदे, सुरेश मगर, समीर शेडगे, संदीप तटकरे, राजेंद्र जाधव आदिंनी उपस्थितांना संबोधित केले. रॅलीमध्ये दोनशेहून अधिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रोह्याचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी रॅलीला सामोरे जात निवेदन स्वीकारले. तसेच निवेदनाचा सर्वंकषपणे विचार करु न आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.