माथेरान : येथे दिवसेंदिवस अल्पवयीन शाळकरी मुले, मुली फिरावयास येत असून त्यांना लॉजधारक काही तासांसाठी खोल्या भाड्याने देत आहेत. याचा परिणाम येथील स्थानिक मुलांवर होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी दिवाळीचा सुट्यांच्या हंगामात लॉजधारकांनी विशेष खबरदारी घेऊन व्यवसाय करावा. प्रत्येक पर्यटकाचे ओळखपत्र तपासून खोल्या द्याव्यात. अल्पवयीन मुलांना खोल्या देऊ नका, अन्यथा लॉज चालकासह प्रथम मालकावर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना सहायक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी लॉजधारकांना दिल्या.पोलीस ठाणे येथील प्रांगणात लॉजधारक आणि नागरिकांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बारवे यांनी सर्वांना मार्गदर्शनपर सूचना केल्या. मुंबईपासून अगदी जवळचे पर्यटन स्थळ माथेरान असल्यामुळे येथे बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते. परंतु काही वर्षांपासून येथे अल्पवयीन प्रेमीयुगुलांची जत्राच भरलेली दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम येथील शाळकरी मुला- मुलींवर तसेच कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांवर होत असून व्यापारी वर्गात देखील तीव्र नाराजी दिसून येत आहे. येथे जवळपास पाचशेहून अधिक खोल्या भाड्याने पर्यटकांना दिल्या जातात. स्वस्त दरात या अल्पवयीन युगुलांना येथे मिळत आहेत. याचा दुरु पयोग ही मुले करीत असल्याचे बारवे यांनी सांगितले.काही दिवसांनी दिवाळीचा सिझन सुरु होणार आहे यासाठी बारवे यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. (वार्ताहर)
अल्पवयीन मुलांना खोल्या देऊ नका
By admin | Published: October 24, 2015 12:57 AM