५० कोटी नको, ५० किल्ले ताब्यात द्या, संवर्धन करून दाखवितो: संभाजीराजे छत्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 06:08 AM2023-06-07T06:08:46+5:302023-06-07T06:10:46+5:30
शिवराज्याभिषेक सोहळा: रायगडावर घुमला ‘जय भवानी... जय शिवराय...’चा नारा
सिकंदर अनवारे, लोकमत न्यूज नेटवर्क, महाड : किल्ले रायगडावर मंगळवारी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी हजेरी लावत छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यावेळी युवराज संभाजीराजे यांनी आम्हाला ५० कोटी नकोत तर राज्यातील ५० किल्ले ताब्यात द्या, त्यांचे संवर्धन, रायगड मॉडेल करून दाखवतो, असे आवाहन राज्य सरकारला केले.
राजसदरेवर त्यांच्यासह आमदार राेहित पवार, अनिकेत तटकरे, मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला युवराज संभाजीराजे यांनी अभिषेक केला. तसेच, ३५० सुवर्ण होनांचा अभिषेकही करण्यात आला. २ जूनला तिथीप्रमाणे राज्य सरकारकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रायगडावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी देण्याची घोषणा केली होती. त्याचा संदर्भ देत संभाजीराजे म्हणाले, ‘रायगडावर आलेले मावळे हे आपली प्रेरणा असून या मावळ्यांनी उज्ज्वल महाराष्ट्राच्या भविष्याकरिता पुढे आले पाहिजे.
रात्री उशिरापर्यंत शिवभक्तांची रीघ
गडावर अपेक्षेहून जास्त गर्दी झाल्याने बाहेर पडणे मुश्किल झाले होते. संभाजीराजे यांनी वारंवार आवाहन करूनही मावळे माघारी फिरत नव्हते. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवावे लागले. रात्री उशिरापर्यत मार्गावर भक्तांची रीघ आणि वाहतुकीची कोंडी कायम होती.
१० हजारांवर शिवभक्त आजारी
रायगडावर शिवराज्याभिषेक साेहळ्यासाठी राज्य शासनाने जय्यत तयारी केली होती. असे असले तरी यंदा वाढत्या तापमानाचा मोठा फटका शिवभक्तांना बसला आहे. गेल्या सहा दिवसांत उष्माघातासह डिहायड्रेशन आणि सर्प, विंचूदंश आदी कारणांमुळे सुमारे १० हजार ९८ जणांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यापैकी एकाचा ह्दयविकाराने मृत्यू झाला तर ३२ जणांवर उपचार सुरू असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
न्यू पॅलेस प्रांगणात शाही सोहळा
कोल्हापूर : आंब्याच्या डहाळ्यांनी सजलेल्या कमानी, सनई चौघड्यांचे स्वर, प्रादेशिक सेनादलातील वाद्यवृंदाच्या पथकाने भारलेला उत्साह, पोलिस दलाच्या वाद्यवृंदाने दिलेली सलामी आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा शाही थाटात मंगळवारी कोल्हापुरातील न्यू पॅलेसच्या रम्य परिसरात शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा रंगला.