अलिबाग : समाजातील वाईट आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याकरिता पोलिसांचे अधिकार कमी करून चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा सुयोग्य अर्थ लावला गेला नसल्याने, पोलिसांचे अधिकार कमी केले आहेत असा एक समज निर्माण झाला होता. अटक करताना अटक करण्यामागची सुयोग्य कारणे आणि त्याकरिता आवश्यक पुरावे दोषारोपपत्रात पोलिसांनी नमूद केले पाहिजेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वकील तथा रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रसाद पाटील यांनी सोमवारी येथे केले आहे.२ जानेवारी या महाराष्ट्र पोलीस दलाच्या रेझिंग डेनिमित्त अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी अलिबाग पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आयोजित एका विशेष परिसंवाद कार्यक्रमात अॅड.पाटील बोलत होते. देशातील प्रत्येक राज्याच्या पोलीस दलास स्वत:ची ओळख असावी या हेतूने प्रत्येक राज्य पोलिसांना स्वतंत्र झेंडा २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रदान केला. आणि म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस दलात रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात येत असल्याची माहिती कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. रेझिंग डेनिमित्त आयोजित जनजागृती रॅलीचे उद्घाटन शहरातील आंग्रे चौकातील शिवाजी पुतळ््याजवळ रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रसाद पाटील,क्राइम पेट्रोल दूरदर्शन मालिकेतील महिला पोलीस निरीक्षक भूमिका साकारणाऱ्या हेमलता बाणे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रायगड पोलीसच्या बॅन्ड पथकाच्या शानदार तालावर निघालेल्या या रॅलीमध्ये शहरातील मान्यवर नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक, अधिकारी, महिला व पुरुष पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील आणि क्राइम पेट्रोल दूरदर्शन मालिकेतील महिला पोलीस निरीक्षक भूमिका साकारणाऱ्या हेमलता बाणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. परिसंवादात अलिबागच्या उपनगराध्यक्षा अॅड.मानसी म्हात्रे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ल.नी.नातू यांनीही पोलीस यंत्रणेच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.डी.पाटील यांनी के ले. (विशेष प्रतिनिधी)
पोलिसांचे अधिकार कमी करू नका
By admin | Published: January 04, 2017 4:59 AM