कर्जत : रेल्वे प्रशासनाने महिनाभरापूर्वी काही लोकल गाड्यांमधील बसण्यासाठी असलेली काही आसने काढून टाकली जेणेकरून उभे राहून जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. ही चांगली गोष्ट असली तरी दोन अडीच तासांचा उभे राहून प्रवास करणे कर्जतकर प्रवाशांना शक्य होत नाही म्हणून तशा लोकल गाड्या कर्जतसाठी पाठवू नका, अशी विनंती कर्जतचे रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.कमी आसन संख्येच्या लोकल गाड्या ठाणे किंवा कल्याणपर्यंत पाठविण्यास हरकत नाही. कारण ते अंतर कमी आहे आणि त्या ठिकाणचे प्रवासी नेहमीच उभे राहून प्रवास करतात. मुंबई-कर्जत हे अंतर शंभर किलोमीटर आहे, त्यासाठी दोन ते अडीच तास प्रवास करावा लागतो. इतका वेळ उभे राहून प्रवास करणे शक्यच होत नाही. आताच्या लोकल गाड्यांना बसण्यासाठी आसने आहेत. तरीही कर्जतला येणाºया प्रवाशांना मुंबईहून येताना अंबरनाथ, बदलापूरनंतर बसायला मिळते. कमी आसन संख्येच्या लोकल गाड्या पाठविल्यास कर्जतच्या प्रवाशांना कर्जतपर्यंत बसायलाच मिळणार नाही.त्यामुळे यापुढे कर्जतसाठी कमी आसन क्षमता असलेल्या लोकल गाड्या पाठवू नयेत, अशी विनंती पंकज ओसवाल यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कमी आसनाच्या लोकल कर्जतला पाठवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 6:07 AM