आधी दुरुस्ती करा मगच कालव्यात पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:41 AM2017-11-26T03:41:24+5:302017-11-26T03:41:34+5:30
कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या नाल्याच्या दुरुस्ती नंतर अवघ्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
- कांता हाबळे
कर्जत : कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या नाल्याच्या दुरुस्ती नंतर अवघ्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील दुबार भात शेतीसाठी डिसेंबर महिन्यात पाणी सोडल्यास ते पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे प्रथम कालव्याची डागडुजी करा मगच पाणी सोडा, अशी जोरदार मागणी गौरकामथ आणि वदप आदी गावांतील शेतकºयांनी पाटबंधारे अभियंत्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केली.
कर्जत तालुक्यातील गौरकामथ येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता राजनाल्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता श्रेणी-२ अमित पारधी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक श. रु. माने, मोजणीदार राम व्ही. वाघ, हनुमान कालेकर, मजूर सुरेश सोनावळे उपस्थित होते. ग्रामस्थांनी प्रश्नाचा भडीमार करत अधिकाºयांची बोलती बंद केली. शेतकºयांनी नाल्याची दुरवस्था झाल्याचे अधिकाºयांना सांगितले. मागील वर्षीही याबाबत निवेदन दिले होते. तेव्हा राजनाल्याची डागडुजी करून स्वच्छता करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात नाल्याचे काम न केल्याने नाल्यात जंगली झाडेझुडपे वाढली आहते. नाल्याच्या कडेची माती नाल्यात ढासळल्याने नाल्यात गाळ साचला आहे. अद्यापपर्यंत काहीच काम केले नाही. गेल्या वर्षीही आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते आणि आताही तेच आश्वासन देतात. आता आम्हाला आश्वासन नको ठोस काम पाहिजे, अशी मागणी शेतकºयांनी केली. वदप येथील १३-बी पोटनाल्यालगत पाइप फुटल्याने नाल्याचे पाणी शेजारील तलावात जाते, त्यामुळे तलावाची पातळी वाढून तलावाचा बांध फुटण्याची शक्यता आहे. तसेच तलावाजवळ वस्ती असल्यामुळे तलावाचा बांध फुटल्यास संपूर्ण पाणी त्या वस्तीत शिरण्याची भीती असून, मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागेल. परिणामी, वस्तीमध्ये भीतीचे सावट पसरले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बैठकीत बळीराम खंडागळे, खंडू शिंदे, जगदीश पाटील, कृष्णा चव्हाण, राजेश पाटील, पंकज पाटील आदी शेतकºयांनी समस्या मांडल्या.
वदप तळ्यालगत असलेला राजनाल्याचा आउट लेट पाइप फुटल्याने तलावात पाणी शिरून तलाव ओव्हर फ्लो होत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात, घरांत पाणी शिरून नुकसान होण्याची शक्यता आहे.
- जगदीश पाटील,
शेतकरी, वदप