दासगाव : ऐतिहासिक पाचाड गावात रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णावर उपचार करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना धावाधाव करावी लागत आहे. याठिकाणी रात्रीच्या सेवा बजावण्यास एक डॉक्टर नेमलेले असतानादेखील डॉक्टर उपस्थित राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या या मागणीकडे जिल्हा प्रशासनदेखील दुर्लक्ष करत आहे.किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी पाचाड, सांदोशी, सावरट, रायगडवाडी, नेवाळी, हिरकणीवाडी, आमडोशी, करमर, बावळे, बाउलवाडी, पुनाडे, घरोशी, छत्रीनिजामपूर, टकमकवाडी या गावांना या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आधार आहे. याशिवाय किल्ले रायगडावर आलेल्या पर्यटकांनादेखील याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारांवर निर्भर राहावे लागत आहे. या गावांना पाचाड वगळता जवळपास २४ किमी अंतरावर महाडमध्ये उपचारासाठी किंवा प्रसूतीसाठी येणे शक्य होत नसल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारासाठी नेहमीच गर्दी असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इमारतीची आणि इतर आरोग्य सुविधांचे तीन तेरा वाजले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी कायम आवाज उठवला मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्री प्रसूती किंवा अन्य आजारांवर उपचार करण्यासाठीदेखील रुग्ण दाखल होतात. मात्र रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध नसतात यामुळे या रुग्णांना येथील परिचारिकांच्या उपचारावर अवलंबून राहावे लागत आहे. डॉक्टर याठिकाणी राहत नसल्याने याठिकाणी उपचार होत नाहीत, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.डॉक्टरच रात्री उपलब्ध नसल्याने ऐन रात्री आलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी २४ किमीवर महाडला नेणे अवघड होत. मात्र यादरम्यान अनेकवेळा रुग्णाचा जीव धोक्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. दुर्गम डोंगराळ भाग असल्याने याठिकाणी अनेकवेळा सर्प आणि विंचू दंश होण्याच्या घटना घडतात. अशा वेळी रुग्ण डॉक्टरांच्या निगराणीखाली असणे गरजेचे असते, मात्र याठिकाणी डॉक्टरच नसल्याने रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असल्याचे स्थानिक नागरिक अजय गायकवाड यांनी सांगितले.निवासस्थानांच्या इमारतीची दुर्दशाकर्मचारी आणि डॉक्टर यांना राहण्यास असलेल्या कर्मचारी वसाहतीची पुरती वाट लागली आहे. इमारतीचे छप्पर नुकत्याच आलेल्या वादळात उडून गेले आहेत. यामुळे या इमारतीमध्ये कर्मचारी आणि डॉक्टर राहण्यास तयार नाहीत. त्यातच पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही महिला डॉक्टर असल्याने मोजक्या कर्मचारी वसाहतीमध्ये राहणेदेखील धोकादायक आहे.स्थानिक नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष तरी कोणी द्यायचे?पाचाड ग्रामस्थांनी स्थानिक रुग्ण कल्याण समिती, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आदींकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र गेली अनेक वर्ष याकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक आमदार भरत गोगावलेदेखील या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून अनेकवेळा किल्ले रायगड आणि परिसरात गेले आहेत त्यांनीदेखील कधीच या रुग्णालयाची स्थिती जाणून घेतलेली नाही.गेली अनेक वर्षे आम्ही स्थानिक ग्रामस्थ पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत आहे मात्र आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, यामुळे परिसरातील रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. -शाश्वत धेंडे, सामाजिक कार्यकर्ते, पाचाड
महाड तालुक्यात पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:42 AM