खांडस आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर
By admin | Published: January 14, 2017 06:54 AM2017-01-14T06:54:37+5:302017-01-14T06:54:37+5:30
कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र पाहायला मिळते. यात अधिक भर म्हणजे अतिदुर्गम
कांता हाबळे / नेरळ
कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र पाहायला मिळते. यात अधिक भर म्हणजे अतिदुर्गम आदिवासी भागातील खांडस प्राथमिक आरोग्य केंद्र लोकांना आरोग्य सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. येथील डॉक्टर सतत गैरहजर राहत असून कर्मचारी देखील बिनधास्त आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या रु ग्णांना उपचाराविना परतावे लागत आहे.
खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्रात राहणे अभिप्राय असून शासनाने कर्मचाऱ्यांसाठी लाखो रु पये खर्च करून प्रशस्त इमारत बांधली आहे. तरी देखील येथे एकही कर्मचारी राहत नाही. यामुळे रात्रीच्या वेळी येणाऱ्या रु ग्णांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांना उपचारासाठी १२ किमी कशेळे येथे जावे लागते. आलेल्या रु ग्णांना वेळीच उपचार न मिळाल्यामुळे रु ग्ण दगावल्याच्या अनेक घटना देखील येथे घडल्या आहेत. वरिष्ठांकडून येथे राहण्याचे आदेश असून देखील एकही कर्मचारी राहत नसल्याने वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे वेतन रोखण्यात यावे अशी जिल्हापरिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी खांडस पाथमिक आरोग्य कें द्रात घेतलेल्या सभेतमागणी केली आहे.
कर्जत तालुक्यातील बहुतांश भाग आदिवासी अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. आदिवासी भागात शिक्षण, रस्ते ,पाणी आणि आरोग्य या समस्या त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहेत. खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त असलेल्या डॉक्टर गीता कदम सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची फार गैरसोय होत असते. तसेच येथे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी नव्याने वसाहत असून देखील डॉक्टर तसेच एकही कर्मचारी राहत नाही. जिल्हा आणि तालुका वरिष्ठांकडून वारंवार येथे राहण्याचे आदेश देऊन देखील येथील कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील एक वर्षांपासून डॉक्टर सतत गैरहजर असतात त्यामुळे रु ग्णांची फार हाल होत असतात. एक महिन्यापूर्वी खांडस येथील विमल भोपी (५५) यांना रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले परंतु दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुढे कशेळेला हलवण्यात आले, त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यांना वेळीच डॉक्टरांकडून उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचवता आला असता असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
खांडस प्राथमिक केंद्र हे अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागात असल्याने येथील नागरिकांना खांडस दवाखाना हा एकच पर्याय आहे. खांडस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ६ उपकेंद्र येत असून ४० पेक्षा अधिक आदिवासी वाड्या या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. परंतु येथील कर्मचारी नेहमीच गैरहजर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी येथे डॉक्टर तसेच एकही कर्मचारी राहत नाही त्यामुळे नागरिकांना फार हाल सहन करावे लागतात. तसेच हा संपूर्ण आदिवासी भाग असल्याने सर्पदंश आणि साथीचा रोग असलेल्या रु ग्णांची संख्या अधिक असते यासाठी कायमस्वरूपी डॉक्टर देण्याची नागरिकांची मागणी आहे.