दासगाव आरोग्य केंद्रातील डॉक्टर बेकायदा रजेवर
By admin | Published: September 1, 2016 03:15 AM2016-09-01T03:15:05+5:302016-09-01T03:15:05+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी दोन अपघात झाले. या अपघातातील जखमींना दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरच्या बेकायदा रजेचे गौडबंगाल उघड झाले
सिकंदर अनवारे, दासगाव
मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी दोन अपघात झाले. या अपघातातील जखमींना दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरच्या बेकायदा रजेचे गौडबंगाल उघड झाले आहे. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विशाल पाटील हे वरिष्ठांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच रजेवर गेले तर गोरेगावचे डॉक्टर त्यांच्या जागी काम करताना आढळल्याने आरोग्य सेवेतील हा सावळागोंधळ उघड झाला आहे.
बुधवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर या दोन अपघातांमध्ये गाड्यांचे चालक जखमी झाले. किरकोळ दुखापती झालेल्या त्या चालकांना प्रथमोपचारासाठी दासगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. विशाल पाटील हे रजेवर गेले असल्याचे सांगत येथील नर्स आणि शिपायांनी उपचार सुरू केले. कोणताही जबाबदार वैद्यकीय अधिकारी समोर नसताना सुरू असलेल्या या प्रथमोपचाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. पाटील हे रजेवर गेले आहेत. याची खातरजमा करण्यासाठी महाड तालुका आरोग्य अधिकारी एजाज बिराजदार यांना संपर्क केला असता दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे
डॉ. पाटील यांनी कोणताच अर्ज कार्यालयात दिला नसून त्यांच्या रजेबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे डॉ. पाटील बेकायदा रजेवर गेल्याचे उघड झाले आहे.
डॉ. पाटील रजेवर असताना गोरेगाव येथील डॉ. अश्विता शेट्टी या दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करीत असल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ कार्यालय आणि अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना नसताना एक डॉक्टर रजेवर जातो. त्या जागी दुसरा डॉक्टर आपली ड्युटी बजावतो, असे हे गौडबंगाल या प्रकरणामुळे उघड झाले आहे.