- अंकुश मोरेवावोशी : सध्या सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा धसका खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकांनी घेतला असून दोघेही गैरहजर राहिल्याने शनिवारी रात्री दिवस भरलेल्या गर्भवती महिलेला उपचाराअभावी राहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नावनोंदणी असलेल्या गरोदर महिलेला शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने तिचा पती आणि नातेवाईक खालापूर आरोग्य केंद्रात घेऊन गेले, परंतु रुग्णालयात पूर्णपणे अंधार आणि शुकशुकाट होता. रात्रपाळीसाठी असलेल्या सुरक्षारक्षकाला उठविले असता डॉक्टर बाहेरगावी गेल्याचे उत्तर मिळाले. तसेच रात्रपाळीसाठी असलेली परिचारिका गैरहजर असल्याचे सांगितले. महिलेला जास्त त्रास होत असल्याने ड्युटीवर नसलेल्या परिचारिकेला विनंती करून तपासण्याची विनंती नातेवाइकांनी केली. परिचारिकेने तपासणी करून खोपोली येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी पी.बी. रोकडे यांना फोन करून माहिती दिल्यानंतर त्यांनादेखील खालापूरचे डॉक्टर तसेच परिचारिका हजर नसल्याबद्दल आश्चर्य वाटले. काही तरी व्यवस्था करतो, असे सांगितले. अखेर नातेवाइकांवर गर्भवतीला घरी नेण्याची पाळी आली.रात्रपाळीसाठी तैनात परिचारिका का गैरहजर राहिली याबाबत चौकशी करून त्यावर कारवाई करू. मी संध्याकाळी सात वाजेपर्यंत खालापुरात कोरोनाबाबत बैठकीसाठी तहसीलदारांसोबत होतो. - डॉ. अनिलकुमार शहा,वैद्यकीय अधिकारी, खालापूर प्रा.आ. केंद्रमाझ्या पत्नीला त्रास होऊ लागल्याने आम्ही आरोग्य केंद्रात गेलो. डॉक्टर आणि नर्स नसल्याने खोपोलीला जा असे उत्तर मिळाले. आरोग्य केंद्राच्या इमारतीवर लाखो रुपये खर्च करून उपचार मिळत नसतील तर अशा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे.- किशोर गायकवाड, खालापूर
डॉक्टर, परिचारिका गैरहजर , खालापुरात आरोग्य केंद्र सुरक्षारक्षकाच्या भरवशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 2:00 AM