उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:38 PM2019-06-17T23:38:40+5:302019-06-17T23:38:49+5:30
कर्जतमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाची गैरसोय
कर्जत : कर्जत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांची नेहमीच वानवा असते. शनिवारी येथील डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असल्याने रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होण्यासाठी एका महिलेला उल्हासनगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांमधून संताप व्यक्त होत असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
कर्जतपासून नऊ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कडाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच फुलाजी पवार यांनी शनिवारी आपली मुलगी दीपिका गणेश आव्हाड हिला प्रसूतीसाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणले होते. यावेळी तिच्यासोबत भाऊ, आई व अन्य तीन व्यक्ती होत्या. मात्र, यावेळी रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर दारूच्या नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी महिलेवर उपचार करण्यास असमर्थता दर्शवली, तसेच मद्यधुंद अवस्थेत असभ्य बडबडही केली. यावेळी पवार कुटुुंबीयांनी नाराजी व्यक्त करीत कडाव येथून रुग्णवाहिका मागून मुलीला उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्याने प्रसूती सुखरूप झाल्याने पवार कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
परंतु या प्रकारामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कारभार उघड झाला आहे. येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांवर नेहमीच मनमानी करतात. रुग्णालयातील अस्वच्छता, रुग्णसेवेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याप्रकरणी लोकप्रतिनिधी तरी लक्ष देणार का? असा प्रश्न रुग्णांकडून उपस्थित होत आहे.
कर्जत तालुका हा आदिवासीबहुल असून कुषोषणाचे प्रमाण अधिक आहे. सरकारकडून आरोग्य सेवांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो, मात्र लाभार्थींपर्यंत जर रुग्णसेवा पोहोचत नाही. या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून होत आहे.