रुग्णसेवेसाठी डॉक्टरांचा उसना ताफा, १६ पैकी ११ डॉक्टर अलिबागसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 02:48 AM2019-11-29T02:48:22+5:302019-11-29T02:49:53+5:30
जिल्हा सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांच्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांच्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. यावर तातडीने उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून १६ डॉक्टरांची उसनवारी केली आहे. त्यातील तब्बल ११ डॉक्टरांची ड्युटी अलिबागच्या सरकारी रुग्णालयात लावण्यात आली आहे. याबाबतचा प्रशासनाने आदेशच काढलेला असल्याने या डॉक्टरांना आता नेमून दिलेल्या रुग्णालयात आपली सेवा देणे बंधनकारक केले आहे. डॉक्टरांनी आदेशाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जड दमच प्रशासनाने दिला आहे.
प्रशासनाने घेतलेला निर्णय हा केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला. सर्व डॉक्टरांना २७ नोव्हेंबरपासूनच नेमून दिलेल्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक होते, मात्र बुधवारी रात्री पनवेल तालुक्यातील तारा हायस्कूलमधील सुजय उदय भोगले या विद्यार्थ्यांला सर्पदंश झाल्याने त्याला उपचारासाठी त्याच्या नातेवाइकांनी अलिबागच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारासाठी डॉक्टरच नसल्याने रुग्णासह नातेवाईक कमालीचे भयभीत झाले होते. त्यामुळे स्वत: डॉक्टरांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल फुटाणे यांना फोन केला असता ते एका रुग्णाच्या शस्त्रक्रियेत व्यस्त होते.
त्यानंतर त्यांनी सर्पदंश झालेल्या विद्यार्थ्याला तपासले. डॉक्टरांची उसनवारी करूनदेखील उपायोग झाला नसल्याने सावंत यांनी संताप व्यक्त केला. आज उसनवारीमधील दोन डॉक्टर हजर झाले आहेत, तसेच संपामधील दोन डॉक्टरही रुजू झाले आहेत, अशी माहिती डॉ. फुटाणे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
पोलादपूर रु ग्णालयातील डॉक्टरांना महाड आणि पोलादपूर येथे द्यावी लागणार सेवा
पोलादपूर रुग्णालयातील डॉ. भाग्यरेखा पाटील या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांना ग्रामीण रु ग्णालय महाड आणि पोलादपूर येथे आठवड्यातून तीन दिवस गुणात्मक सेवा द्यावी लागणार आहे. जसवली रुग्णालयाचे डॉ. एम.डी. ढवळे हे वैद्यकीय अधीक्षक आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे आठवड्यातून एक दिवस श्रीवर्धन येथे चार दिवस आणि मुरूड येथील रुग्णालयात एक दिवस सेवा द्यावी लागणार आहे.
माणगावचे डॉ. गौतम देसाई या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पेण आणि रोहा येथे आठवड्यातून एक दिवस जावे लागणार आहे. डॉ. रामकृष्ण माधवराव पाटील हे कर्जत येथे कार्यरत आहेत. त्यांना गुणात्मक सेवा देण्यासाठी अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात आठवड्यातून दोन दिवस आणि कर्जत येथे तीन दिवस राहावे लागणार आहे. डॉ.एम.टी. मेहता वैद्यकीय अधिकारी (श्रीवर्धन) यांना म्हसळा रुग्णालयात आठवड्यातून पाच दिवस आणि जिल्हा सरकारी रुग्णालय अलिबाग येथे आठवड्यातून एक दिवस रुग्णांची सेवा करावी लागणार आहे. डॉ. प्रभाकर चांदणे हे महाड रुग्णालयात कार्यरत आहेत त्यांना अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात आणि महाडच्या रुग्णालयात आता प्रत्येक आठवड्यातून तीन दिवस काम करावे लागणार आहे.
पनवेल रुग्णालयातील डॉ. अश्विनी सोनावले यांना पनवेल येथे दोन दिवस, चौक रुग्णालयात एक दिवस आणि पेण रुग्णालयात तर उरलेले चार दिवस मुख्यालयात हजर राहावे लागणार आहे. डॉ. विक्र ांत खंदाडे कशेळे येथील रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांना आता जिल्हा सरकारी रुग्णालयातच राहावे लागणार आहे. डॉ. नागनाथ यम्पले हे अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांना आता नव्या आदेशानुसार आठवड्यातून एक दिवस जिल्हा सरकारी रुग्णालयात येऊन रुग्णांवर उपचार करावे लागणार आहेत. तसेच अन्य दिवस त्यांना मुख्यालयातच राहावे लागणार आहेत.
डॉ. दीपक अडकमोल हे सुद्धा अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ म्हणून महाड रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांना पोलादपूर येथे एक दिवस, माणगाव येथे एक दिवस आणि महाड येथे मुख्यालयात पाच दिवस राहावे लागणार आहे. डॉ. राजेंद्र खाडे हे महाड येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांना चौक येथे तीन दिवस, पनवेल येथे दोन दिवस आणि कर्जत येथील रुग्णालयात रुग्णांवर आठवड्यातून एक दिवस उपचार करावे लागणार आहेत. डॉ. प्रदीप इंगोले हे माणगाव येथे कार्यरत आहेत. त्यांना अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात तीन दिवस आणि उर्वरित दिवशी माणगाव येथे राहावे लागणार आहे.
डॉ. संध्यादेवी राजपूत यांना पनवेल येथील रुग्णालयातून अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये प्रत्येक आठवड्यातून सात दिवस सेवा करावी लागणार आहे. डॉ. विनोद कुटे हेसुद्धा पनवेल येथे कार्यरत आहेत, त्यांनाही जिल्हा सरकारी रुग्णालय आणि कर्जत रुग्णालयात प्रत्येकी तीन दिवस राहावे लागणार आहे. कर्जत रुग्णालयातील डॉ. वसंत भालशंकर यांनाही अलिबागच्या सरकारी रुग्णालयात हजर राहावे लागणार आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयातील डॉ. जयश्री अंभोरे यांनाही अलिबाग येथेच सातही दिवस थांबावे लागणार आहे.
रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टरांची उसनवारी केली आहे. त्यांना २७ नोव्हेंबरपासून नेमून दिलेल्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे. नेमून दिलेल्या ठिकाणी संबंधित डॉक्टर हजर होणार नाहीत त्यांची नावे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसेच वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात येणार आहेत, असे आदेश नमूद के ले आहे.
- डॉ. अजित गवळी,
जिल्हाशल्य चिकित्सक