अलिबाग : माणगाव येथील मधुकर पालकर यांना विषारी सापाने दंश केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तातडीने पालकर यांच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचवला आहे. मधुकर पालकर याना ६८ सर्प दंश प्रतिबंधत्मक इंजेक्शन देण्यात आले. पालकर यांची प्रकृती आता स्थिर असून अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
माणगाव तालुक्यातील दहीवली येथील मधुकर पालकर वय ५५ वर्ष हे ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात काम करीत होते. त्यावेळी शेतात फिरत असलेला विषारी घोणस सर्पाने त्यांच्या उजव्या पायाला दंश केले. सापाने दंश केल्याचे लक्षात येताच शेतात काम करणाऱ्या त्याच्या कुटुंबातील लोकांनी तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सर्पदंशाने चावा घेतल्याने पालकर यांच्या अंगात विष भिनले होते. पालकर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले.
डॉक्टरांनी पालकर याना त्वरित सर्पदंश प्रतिबंधक लसीचे २० डोस मारले. मात्र तरीही त्याची प्रकृती अत्यवस्थ होती. पालकर हे रक्त्याच्या उलट्या करीत होते. अखेर डॉक्टरांनी त्यांना अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने हलविण्यास सांगितले. कुटुंबीयांनी त्वरित पालकर यांना रुग्णवाहिकेत टाकून अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. डॉ हिवरे यांनी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यानंतर अजून ४८ इंजेक्शन दिले. तसेच फ्रेश फ्रोजन प्लाझ्माच्या ८ पिशव्या लावण्यात आल्या. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर मधुकर पालकर याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊन त्याचे प्राण वाचविण्यात यश आले. डॉ करण वाघमारे, डॉ अपूर्वा पाटील, डॉ. श्रीकृष्ण हिवरे, डॉ सुभाष बनकर, सिनियर परिचारिका तृप्ती म्हात्रे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली आपली सेवा चोख बजावली.
पावसाळ्यात शेतात काम करताना सरपटणारे प्राण्याची भीती असते. सध्या जिल्ह्यात शेतात लावणी सुरू असल्याने सर्प, विंचू याचा वावर वाढला आहे. तसेच घराच्या बाहेरील अडगळीच्या जागेतही वावर असतो. त्यामुळे शेतात तसेच अडगळी मध्ये काम करताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पेण येथे सारा ठाकूर सर्पदंश प्रकरण झाल्यापासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही सतर्क झाली आहे.
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने तपासणी करून मनगटावर लक्षणानुसार प्रथम दोन चार तासात १५ ते २० अँटी स्नेक वेनम इंजेक्शन देण्यात यावेत. तसेच जिल्हा रुग्णालयात रुग्णाला पाठविताना रुग्णवाहिकेत डॉक्टर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधा आहे का याची खात्री करूनच पाठवा. अशा सूचना सर्व वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी याना केल्या आहेत. - डॉ अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय