म्हसळ्यात ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची वानवा; नवजात शिशू दगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:21 PM2018-10-13T23:21:12+5:302018-10-13T23:21:33+5:30
- अरुण जंगम म्हसळा : तालुक्यात शासकीय रुग्णालयाची वास्तू मोठी असली तरी उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि पुरेशा आरोग्य सुविधा ...
- अरुण जंगम
म्हसळा : तालुक्यात शासकीय रुग्णालयाची वास्तू मोठी असली तरी उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने गेली अनेक वर्षे शहरी आणि ग्रामीण भागातील रु ग्णांची हेळसांड होत आहे.
म्हसळे तालुक्यातील सुमारे दहा हजार लोकवस्तीकरिता मेंदडी पंचायत समितीच्या गणात दहा वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालय दर्जाचे प्राथमिक आरोग्यकेंद्र उभारण्यात आले. मात्र, या भव्य इमारतीत रुग्णांना आवश्यक आणि मूलभूत आरोग्यसेवाही उपलब्ध होत नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण रु ग्णालयासह प्राथमिक आरोग्यकेंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. मेंदडी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्र डॉक्टरविना ओस पडले आहे. येथील रु ग्णांंची गैरसोय टाळावी, याकरिता तातडीने नवीन डॉक्टरची नेमणूक करावी, अशी लेखी मागणी माजी सभापती महादेव पाटील यांनी रायगड जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याकडे केली आहे.
मेंदडी येथे रुग्णांची तात्पुरती सुविधा म्हणून तालुका आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्यकेंद्र पाभरे येथील डॉ. सुशांत गायकवाड यांची अर्धवेळ नियुक्ती केली आहे. रुग्णालयात अन्य कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असून, गंभीर रुग्णांना आवश्यक असणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने, खासगी दवाखान्यात किंवा तालुक्याबाहेर जाऊन उपचार घ्यावे लागतात. वेळीच उपचार मिळत नसल्याने कधी कधी रु ग्ण प्रवासातच दगावण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
मेंदडी प्राथमिक आरोग्यकेंद्र बंद असल्याने काळसुरी येथील देवदास सावकार यांनी त्यांची मुलगी मयूरी भोपी हिला पहिले बाळंतपण करण्यासाठी गुरुवार, ११ आॅक्टोबर रोजी सकाळी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी सायंकाळी तिला खासगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
मात्र, तोपर्यंत उशीर झाल्याने आणि अॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने तिची प्रसूती ग्रामीण रुग्णालयातच झाली, या वेळी नवजात शिशूची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून, त्याला महाडला घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, तोपर्यंत बाळ दगावले होते. या वेळी डॉक्टराच्या हलगर्जीमुळे बाळ दगावल्याची तक्रार मयूरीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी
- ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने याआधीही दोन नवजात शिशू दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. बाळंतपणाकरिता दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टर किंवा तज्ज्ञ परिचारिका नसल्याने, नवजात शिशू दगावण्याचा किंवा गरोदर मातेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. म्हसळा येथे घडलेल्या घटनेची जिल्हा आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी वेळीच दखल घेऊन, संबंधित डॉक्टरबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देवदास सावकार यांनी तक्रार अर्जात केली आहे.
- म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार श्रीवर्धन येथील डॉक्टर मधुकर ढवळे यांच्याकडे आहे, त्यांना या घटनेची माहिती दिली असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर वेळीच उपलब्ध झाले असते, तर नवजात शिशू वाचला असता, असे सावकार यांनी सांगितले.
- म्हसळा तालुक्यातील बहुतांश भाग हा ग्रामीण लोकवस्तीचा आहे. येथील नागरिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र अपुºया मनुष्यबळाअभावी रुग्णांवर वेळीच योग्य उपचार होत नाही. परिणामी रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.