रायगड : काेराेनाला राेखण्यासाठी सर्वत्रच युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांवर उपचार करताना विविध औषधांचा वापर करण्यात येताे. त्यामध्ये प्रामुख्याने रेमडेसिविरमुळे रुग्णांना त्रास झाल्याचे काहीच दिवसांपूर्वी समाेर आले हाेते. त्यामुळे काेराेनावर उपचारा दरम्यान रुग्णांनी संबंधित डाॅक्टरांना आपल्या आजाराबाबत अवगत करावे तसेच डाॅक्टरांनी रुग्णांची केस हिस्ट्री तपासूनच औषधे द्यावीत, असे तज्ज्ञ डाॅक्टरांचे मत आहे. काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या अद्यापही म्हणावी तशी आटोक्यात आल्याचे दिसत नाही. सरकार आणि प्रशासन काेराेनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येते. मध्यंतरी रेमडेसिविर इंजेक्शन दिल्याने जिल्ह्यातील तब्बल ९० रुग्णांना साइड इफेक्ट झाला हाेता. हे सर्व रुग्ण खासगी रुग्णालयातील हाेते. प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्व साठा परत घेतला हाेता. या घटनेने जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली हाेती. त्याचप्रमाणे स्टेराइडचा डाेसही काेराेना रुग्णांना दिला जातो . सध्या तरी काेणत्याही रुग्णावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याची सरकार दप्तरी नाेंद नाही.
काय हाेतात परिणाम रेमडेसिविर इंजेक्शनमुळे उलटी, मळमळणे, अंग लाल हाेणे, अंगावर पुरळ येणे, अंग कापणे असे परिणाम हाेऊ शकतात. किडनी आणि लिवर, ह्रदयासंबंधी आजार असतात त्यांनाही त्याचे वाईट परिणाम हाेऊ शकतात. स्टेराॅइडचा वापर एखाद्या मधुमेह असणाऱ्या रुग्णांना दिल्यास त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अधिक वाढू शकते. इन्सुलिन देऊन त्यांचे साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणावे लागते.
साखरेचे प्रमाण नियत्रंणात असावे अंगावर पुरळ येणे, मळमळणे, उलटी येणे, अंग लाल हाेणे असे दुष्परिणाम दिसून येतात. तसेच किडनी, ह्रदयराेग, लिव्हरसंबंधी आजार आहेत. त्यांची केस हिस्ट्री तपासूनच त्याचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा ते डॅमेज हाेण्याची शक्यता असते.
स्टेराॅइडच्या वापरामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्याला मधुमेह आहे आणि ज्याला काेराेना झाला आहे. त्याच्यावर स्टेराॅइडचा वापर केल्यास त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. तसेच ते नियंत्रणात आणण्यासाठी इन्सुलिनशिवाय पर्याय राहात नाही.
रेमडेसिविरचे साइड इफेक्ट रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन टाेचण्यात आल्याने सुमारे ९० रुग्णांना मळमळणे, उलटी, अंग कापणे, रॅशेस असा काही प्रमाणात त्रास झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या हाेत्या. त्यानंतर काही तांत्रिक कारणाने कंपनीने काेविकाेफर नावाच्या बॅच नंबर एचसीएल २१०१३ इंजेक्शनचा वापर थांबवण्याची विनंती केली. पेण येथील रायगडच्या सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले हाेते. हे सर्व रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत हाेते. तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
ज्यांना कॅन्सर, किडनी, ह्रदय, लिव्हर, मधुमेह असे आजार असतील त्यांनी अधिक काळजी घेत घराबाहेर पडून नये, काेराेनावरील उपचार करताना आपल्या आजाराची माहिती डाॅक्टरांना देणे गरजेचे आहे. संबंधित डाॅक्टरांनी त्यांची केस हिस्ट्री पाहावी. - डाॅ. राजीव तांबाळे, फिजिशियन
काेराेना हाेऊ नये यासाठी प्रथम सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दी टाळावी, वेळेवर टेस्ट करून डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. रेमडेसिविर आणि स्टेराॅइड देताना संबंधित डाॅक्टरांनी रुग्णांची केस हिस्ट्री तपासूनच त्याचा आवश्यक असल्यास वापर करावा.- डाॅ. प्रणाली पाटील