चार वेळा कागदपत्र देऊनही मदत नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:38 PM2020-09-29T23:38:35+5:302020-09-29T23:38:48+5:30
नुकसानग्रस्त मारताहेत तहसील कार्यालयात फे ऱ्या
म्हसळा : निसर्ग चक्रीवादळाने सर्वच उद्ध्वस्त करून, म्हसळा तालुक्यातील नागरिकांचा आर्थिक कणा मोडून ठेवला आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीला जरी शासन तत्परतेने धावून आले असले, तरी प्रशासनाकडून मात्र या नुकसानग्रस्तांची थट्टा सुरूच आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे म्हसळा तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या नागरिकांना शासनाने तत्परता दाखवत मदतीचा हात दिला असला, तरी अनेक नुकसानग्रस्त अद्याप या मदतीपासून वंचित राहिले आहेत.
या नागरिकांनी आपापल्या विभागातील तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार कागदपत्रे देऊनही म्हसळा तहसीलमधून या नागरिकांची थट्टा सुरूच आहे. या नागरिकांना तुम्ही बँकेत जा, बघा पैसे आले असतील, कागदपत्रे चुकले असतील, असे उत्तर देऊन वारंवार इकडून-तिकडून फेºया मारावे लागत आहेत. मात्र, पैसे खात्यात कधी येणार, याबाबत अद्याप चालढकल होत असून, कोणताही अधिकारी उत्तर देत नाही.
मी निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर किमान चार ते पाच वेळा आधार कार्ड, पासबुक झेरॉक्स व तलाठी मागेल ती कागदपत्रे दिलेली आहेत. तरीही माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
- रमेश गोरीवाले, सांगवड