खालापूर : पिसाळलेल्या कुत्र्याने अठरा जणांना चावा घेत जखमी केल्याची घटना सोमवारी खालापूर तालुक्यात घडली असून तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.तालुक्यातील नावंढे, केळवली, हाळ, आंजरूण, खालापूर, सारसन तसेच नडोदे भागात कुत्र्याने चावा घेवून जखमी केल्याची घटना घडली आहे. खालापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी नवनाथ कोकरे हे वनवे निंबोडे गावाच्या रस्त्यावर मॉर्निंग वॉककरिता निघाले असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला. कोकरे यांनी कुत्र्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतउपचारासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. पिसाळलेल्या कुत्र्याच्या तावडीत हाळ येथील अब्बाजी जळगावकर, खानावचे कृष्णा पाटील, नावंढेमधील ताई वाघमारे, संतोष वाघमारे, कमल हाडप, साहिल नाईक, नीलेश रसाळ, आनंद सकपाळ, किशोर पिंगळे, वैशाली पिंगळे, समाधान मंडवे, विजय अवघडे,दत्तात्रय दिसले, नितू देवी, गीता लोहार व नडोदे येथील वैजनाथ शिंदे देखील सापडले. शिंदे यांच्या गळ्याला चावा घेतल्याने त्यांना पनवेल येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. इतर जखमींवर खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी उशिरा पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारण्यात आल्याची माहिती मिळाली असली तरी ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सतरा जणांवरउपचार करण्यात आल्याची माहिती परिचारिकेने दिली.
अठरा जणांना कुत्र्याचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 3:12 AM