जांभुळपाड्यात कुत्र्यांची दहशत, महिनाभरात १५ जणांना कुत्र्याने घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:39 PM2019-04-30T23:39:03+5:302019-04-30T23:39:25+5:30
उपाययोजनेची नागरिकांची मागणी : महिन्याभरात घेतला १५ जणांना चावा; प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांअभावी उपचाराची पंचाईत
पाली : सुधागड तालुक्यातील पाली, जांभुळपाड्यासह अनेक गावात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. येथील वऱ्हाड जांभुळपाड्यासह पालीतील १५ जणांना महिनाभरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना समोर आल्याने येथील नागरिकांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. श्वानदंश झालेल्या जखमींवर पाली प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार करण्यात आले. मात्र, श्वानदंश झाल्यानंतर जांभुळपाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमीला उपचाराकरिता आणले असता, या ठिकाणी कायमस्वरूपी निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणी व त्रासाला सामोरे जावे लागते.
पाली सुधागडसह जांभुळपाडा, परळी विभागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने अक्षरश: दहशत पसरली असून रस्त्यावरून चालताना एकट्या व्यक्तीला चारीबाजूंनी कुत्री घेराव घालत असल्याने नाइलाजास्तव हातात दगडगोटे घेऊन चालण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मोकाट कुत्र्यांचा लहान मुले व वृद्धांना खूप त्रास होत आहे. अशातच प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अशातच पिसाळलेला कुत्रा कधी अंगावर येईल याचा नेम नाही, त्यामुळे रात्री-अपरात्री बाहेर पडणे अथवा कामानिमित्त बाहेर गेलेल्या व्यक्तीला घरी येण्यास उशीर झाला तर पिसाळलेल्या कुत्र्याची मोठी भीती सतावत आहे.अशा या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांवर प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
श्वानदंश झाल्यानंतरच्या उपचाराबाबत पाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रुस्तुम दामले यांना विचारणा केली असता श्वानदंश झालेल्या जखमींना आवश्यक ती रेबीज लस व इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध आहेत. महिनाभरात श्वानदंश झालेल्या १५ जणांवर उपचार करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. श्वानदंश झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात तातडीने उपचार केले जात असल्याचे डॉ. दामले म्हणाले.