- निखिल म्हात्रेअलिबाग : दरवर्षीच उन्हाळा लागला की रक्ताचा तुटवडा होतो. यंदा तर कोरोना संसर्ग आहे. त्यामुळे वर्षभरापासून बंद असलेले कॉलेज व ग्रामीणमध्येही कोरोनाचे रुग्ण निघत असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कोरोना लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन होत आहे.रक्तदात्यांनी कोरोनाचे लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गाच्या धाकाने रक्तदाते अलीकडे पुढे यायला तयार नाहीत. प्रशासन, सामाजिक संस्थांच्या आवाहनानंतर रक्तदान शिबिराला मिळणारा प्रतिसाद आता कमी झालेला आहे व त्यामुळेच आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येकाने रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा जीव वाचतो. सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये लस घेतल्यानंतर व दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येणार असल्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे आहे.जिल्ह्यातील रुग्णालय मिळून सुमारे १०० पिशव्यांची गरज भासते. यात सिकलसेल, ॲनेमिया, थॅलेसिमिया, प्रसूती, विविध ऑपरेशनमध्ये रक्तपिशव्या, रक्तघटक लागतात. त्यामुळे शिबिर घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय रक्तसंकलनाची गरज पूर्ण होणार नाही. रक्तदाते व शिबिर संयोजकांना रक्तपेढीकडून विनंत्या केल्या जात आहेत. मात्र, कोरोनाच्या संक्रमणाच्या भीतीने दाते रक्तदानाला तयार होत नसल्याने शिबिर संयोजकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्यासाठी विनंती करत असून, त्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनालाही सहकार्याची विनंती करणार असल्याची जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीकडून सांगण्यात आले.
लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर २८ दिवस थांबावे लागणार, रक्तदात्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:57 AM