माथेरानची अळंबी खाद्यप्रेमींना देणगी
By admin | Published: June 13, 2017 02:57 AM2017-06-13T02:57:44+5:302017-06-13T02:57:44+5:30
मातीचा गंध, दाट धुके याबरोबर जंगलात उगवणारी अळंबी हे माथेरानच्या पहिल्या पावसाचे वैशिष्ट्य. पावसात जंगलात पडलेल्या पालापाचोळ्यामध्ये ही अळंबी उगवते.
नेरळ : मातीचा गंध, दाट धुके याबरोबर जंगलात उगवणारी अळंबी हे माथेरानच्या पहिल्या पावसाचे वैशिष्ट्य. पावसात जंगलात पडलेल्या पालापाचोळ्यामध्ये ही अळंबी उगवते. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या अत्यंत छोट्या छत्रीच्या आकाराच्या अळंबी खाद्यप्रेमी मोठ्या चवीने खातात. आता माथेरानच्या जंगलात ठिकठिकाणी अळंबी उगवली असून सकाळी जंगलात जाऊन अळंबी आणणे हा माथेरानकरांचा दिनक्रम अजून दोन आठवडे चालेल.
तज्ज्ञांच्या मते अळंबी ही हरितद्रव्य विरहित फळधारणा करणारी बुरशी आहे. अळंबीस भूछत्र असेही म्हणतात. पुरातन काळापासून संस्कृतमध्ये कुसूंप आणि पौराणिक ग्रंथात भूछत्र म्हणून अळंबीचा उल्लेख आढळतो. अळंबीविषयी कुत्र्याची छत्री अशी चुकीची कल्पना अजूनही आहे. अळंबी औषधीयुक्त आहार असून निसर्गाकडून मिळालेली देणगी मानली जाते. पावसाळ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर, कुजणाऱ्या पालापाचोळ्यावर, झाडाच्या बुंध्याला अळंबी उगवते. अळंबीचे नानाविध प्रकार आहेत. विषारी अळंबी देखील आढळून येते. माथेरानच्या जंगलात पावसाळ्याच्या पहिल्या हंगामात आढळणारी अळंबी म्हणजे पर्वणीच असते. अळंबी उगवण्याची प्रकिया सुरु होताना बारीक तुरा असतो नंतर त्याचे अंडी तयार होतात आणि नंतरची प्रक्रि या म्हणजे अळंबीचे बारीक कळ्यांमध्ये होणारे रूपांतर. एकदा अळंबी खाल्ली तो पुढच्यावर्षी हमखास त्याची वाट पाहतो. मुंबईतील अनेक माथेरानकरांना ही अळंबी आवर्जून पाठवली केली जाते, असे वनसंरक्षक समिती सदस्य प्रवीण सकपाळ यांनी सांगितले.