फक्त साठा नको, काटकसरही करा; आजपासून २ दिवस पाणी येणार नाही
By निखिल म्हात्रे | Published: April 11, 2024 09:39 PM2024-04-11T21:39:10+5:302024-04-11T21:39:22+5:30
- पोयनाड येथील जलवाहिनी दुरुस्ती
अलिबाग: पोयनाड येथे जलवाहिनी दुरुस्तीसाठी एमआयडीसीने १२ एप्रिल रोजी ‘शट डाऊन’ घेतला आहे. त्यामुळे अलिबाग शहराचा होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सायंकाळी बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी पाणी पुरवठा विस्कळीत राहील. पुढील ३ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
अलिबाग नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी सकाळी ११:०० वाजता पाणी टंचाईबाबत आवाहन करण्यात आले. त्यानुसार १२ एप्रिल रोजी पोयनाड येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. एमआयडीसी कार्यालयाकडून त्यासाठी शटडाऊन घेतला आहे.
त्यामुळे शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी संपूर्ण अलिबाग शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. त्यानंतर पुढील ३ दिवस शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. अपव्यय करू नये, असे आवाहन अलिबाग नगर परिषदेने केले आहे.