काेराेनाची लस घेताना घाबरून जाऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:41 AM2021-03-12T00:41:17+5:302021-03-12T00:41:33+5:30
तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला : रक्तदाब, मधुमेह, ॲलर्जी असली तरी आजाराबाबत संबंधितांना अवगत करावे
आविष्कार देसाई
लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्ह्यामध्ये काेराेना लसीकरण जाेमाने सुरू आहे. रक्तदाब, मधुमेह अथवा ॲलर्जी असली तरी काेराेना लस घेताना घाबरून जाऊ नका, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे. फक्त आपल्या आजाराबाबत डाॅक्टरांना अवगत करावे, असेही त्यांनी सुचविले आहे.
रायगड जिल्ह्यात काेरोनाचा रुग्ण ८ मार्च २०२० राेजी सापडला हाेता. त्याला आता तब्बल एक वर्षाचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे. एक वर्षाच्या आतच भारतामध्ये कोरोनावरील काेव्हिशिल्ड आणि काेव्हॅक्सिन अशा दाेन लसींची निर्मिती करण्यात यश आले आहे. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी, फ्रंट वर्कर, पाेलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना काेराेनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना दाेन टप्प्यात लस देण्याची सुविधा संबंधित सरकारी रुग्णालय, प्राथमिक आराेग्य केंद्रांसह काही खासगी रुग्णालयांमध्ये देण्यात येत आहे. आता ज्येष्ठ नागरिकांनाही लस देण्याची व्यवस्था सरकार आणि प्रशासनाने करून दिलेली आहे. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांमध्ये रक्तदाब, मधुमेह, ॲलर्जी यासारखे विकार आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रक्तदाब असाे अथवा मधुमेह किंवा अन्य काेणता आजार, लस सुरक्षित असल्याने ती घ्यावी, असा सल्ला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे. लस घेताना संबंधित डाॅक्टरांना असणाऱ्या समस्या आणि विकार यांची माहिती आवर्जून द्या, असेही सांगायला तज्ज्ञ डाॅक्टर विसरले नाहीत. तसे केल्याने काही रिॲक्शन झालेच तर संबंधित डाॅक्टरांना उपचार करणे साेपे जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
थंडी, ताप आला तरी काळजी करू नका
लसीकरण झाल्यावर थंडी, ताप आला तरी अजिबात घाबरून जाऊ नये. लसीकरणात जी औषधे डाॅक्टरांनी दिली आहेत, ती त्यांनी वेळेत घ्यावीत. सर्वांनाच ताप येत नाही. त्यामुळे निश्चिंत राहावे, असे आवाहन आराेग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे.
काेराेना लस सुरक्षित आहे. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी लस घेतल्यास काेणताही त्रास हाेणार नाही. लस घेण्याआधी संबंधित डाॅक्टरांना आपल्या आजाराबाबत आणि नियमित सुरू असलेल्या औषधांबाबत अवगत करून देणे गरजेचे आहे.
- डाॅ. राजीव तांबाळे,
फिजिशियन
काेराेना सलीचा आणि ॲलर्जीचा काहीच संबंध नाही. काही रुग्णांना आम्ही स्टेराॅइडची औषध देतो. त्यानंतर काही रुग्ण स्वतःच्या मनाने गाेळ्या सुरूच ठेवतात. याची कल्पना त्यांनी लसीकरणाच्या वेळी संबंधित डाॅक्टरांना सांगणे गरजेचे आहे. लस घेताना काेणतीच भीती बाळगू नका.
- डाॅ. किरण नाबर,
त्वचाराेग तज्ज्ञ
रक्तदाब असणाऱ्यांनी आपली औषधे सुरूच ठेवावीत. लस घेतल्याने त्यांना त्याचा काहीच त्रास हाेणार नाही. मात्र, लस घेतल्यानंतर सरकारने दिलेल्या त्रिसूत्रीचे म्हणजेच मास्क लावणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे याचे काटेकाेरपणे पालन करणे गरजेचे आहे.
- डाॅ. प्रशांत जन्नावर,
ह्रदयराेग तज्ज्ञ
ज्यांना किडनीचा विकार आहे आणि ज्यांचे डायलिसिस सुरू आहे, त्यांनी काळजी घ्यावी. रुग्णांनी डायलिसिसच्या दिवशी लस घेऊ नये. अन्य वेळी लस सुरक्षित आहे.
- विनीत शिंदे, फिजिशियन