'ओबीसींच्या आरक्षणाला हात लावू नका ', ओबीसी संघर्ष समितीचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:21 AM2020-11-04T00:21:25+5:302020-11-04T00:21:41+5:30
OBC reservation : इतरांना आरक्षण देऊन आमचा हक्क हिरावून घेऊ नका, अशा मागण्या करीत मंगळवारी ओबीसी संघर्ष समितीने मुरुड तहसील कार्यालयाजवळ संघटित होऊन आपले निवेदन मुरुड तहसीलदार गमन गावित यांना दिले.
आगरदांडा : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात लावू नये. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. मुलांना शष्यवृत्तीही मिळत नाही. मग इतरांना आरक्षण देऊन आमचा हक्क हिरावून घेऊ नका, अशा मागण्या करीत मंगळवारी ओबीसी संघर्ष समितीने मुरुड तहसील कार्यालयाजवळ संघटित होऊन आपले निवेदन मुरुड तहसीलदार गमन गावित यांना दिले.
यावेळी ओबीसी सेलचे तालुका संघटक किरण डिके, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, सहसचिव हरिशचंद्र पाटील, मुंबई प्रतिनिधी सुरेश तांबे, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, समाजसेवक सुधीर दांडेकर, भंडारी बोर्डिंगचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, कुणबी युवा अध्यक्ष उमेश मोरे, भावेश भुवड, नगरसेवक पांडुरंग आरेकर, मनोहर मकु, आगरी समाज अध्यक्ष शरद काबुकर मनोज डिके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाने राज्यात जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाचे ओबीसी करणं करू नये, एमपीसीच्या परीक्षा ताबडतोब घेण्यात याव्यात, महाज्योती संस्थेसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी, एसटी व एससीप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सुरू करण्यात यावी, शासकीय नोकरीत ओबीसींना पदोन्नती तत्काळ देण्यात यावी, अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले.