आगरदांडा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला अचानक बंद केल्याने पर्यटकांना किल्ला न पहाता परतावे लागले होते. येणाऱ्या पर्यटकांचे पुन्हा हाल होऊ नये त्याकरिता जंजिरा जल वाहतूक संस्थेने मुरुड तहसीलदार व मुरुड पोलीस ठाणे यांच्याकडे रीतसर निवेदन सुद्धा दिले होते. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. याची दखल घेत किल्ला पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी सोमवारी मुख्य दरवाजा उघडण्यात आला.मुरुड तहसीलदार परीक्षित पाटील व नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी भ्रमणध्वनीद्वारे पुरातत्व खात्याचे सुप्रिटेंडेंट श्रीनिवास नेगी यांच्याशी चर्चा करून शेकडो पर्यटकांवर अन्याय होत असून किल्ल्याचा दरवाजा उघडण्याची विनंती केली. याबाबत जंजिरा किल्ल्याचे सहायक संवर्धक दिलीप येलकर यांना आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे सोमवारी जंजिरा किल्ल्याचा दरवाजा उघडण्यात येऊन पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी खुला करण्यात आला.सोमवारी सकाळी जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडल्यावर जंजिरा पर्यटक संस्थेचे चेअरमन इस्माईल आदमने, व्यवस्थापक नाझीम कादरी, राजपुरी ग्रामपंचायत सरपंच हिरकणी गिदी, विजय गिदी, तबरेज कारभारी आदींनी समाधान व्यक्त केले आहे.
जंजिरा किल्ल्याचा दरवाजा उघडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:28 PM