रायगडमधील मंदिरे उघणार धार्मिक पर्यटनाचे दरवाजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 11:23 PM2020-11-15T23:23:22+5:302020-11-15T23:23:40+5:30
बल्लाळेश्वर, शितलादेवी, हरिहरेश्वर देऊळ परिसरांमध्ये लगबग सुरू ; जिल्ह्यातील उलाढाल आता पूर्ववत होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : करोनामुळे महाराष्ट्र शासनाने मंदिरांमध्ये घातलेली प्रवेशबंदी उठविल्यामुळे रायगड जिल्ह्यातील मंदिरांशी संबंधित असेलेले व्यावसायिक खूश झाले आहेत. धार्मिक पर्यटनामुळे जिल्ह्यात होणारी उलाढाल आता पूर्ववत होणार असल्याने मंदिर परिसरात लगबग दिसू लागली आहे.
रायगड जिल्ह्यात अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थाने आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणेश सुधागड आणि खालापूर तालुक्यांमध्ये आहेत. पाली येथील बल्लाळेश्वर आणि महड येथील वरदविनायक ही क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. गेले सात ते आठ महिने मंदिरे बंद असल्यामुळे या मंदिरांवर उभे असणारे अर्थकारण ठप्प झाले होते. राज्यभरातून लोक या ठिकाणी येतात. पूजापाठातून पुरोहितांना उत्पन्न मिळते. तेही ठप्प झाल्याने मंदिरांचे पुजारीही हवालदिल झाले होते. संत तुकारामांच्या भेटीने परमार्थमय झालेला खालापूर तालुक्यातील साजगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरही घंटानादाने भरून गेला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. कोरोनामुळे या ठिकाणी शुकशुकाट होता. याच परिसरात दिवेआगर येथील गणपती अलीकडेच प्रसिद्धीस आला. विशेष म्हणजे बहुतेक तीर्थक्षेत्रांमध्ये फुले, पूजेचे साहित्य आदी उपयुक्त जिनसांची विक्री करणारे सर्व धर्मांचे आहेत. या व्यतिरिक्त चौल येथील शितलादेवी, बरहिरोळळे येथील कनेकश्वर मंदिरेही उघडल्यामुळे अलिबाग तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे. चौल परिसरात जवळपास तीन हजार मंदिरे आहेत. मंदिर पर्यटनाचा विशेष फायदा रायगड जिल्ह्याला होईल, असा पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभिप्राय आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांना जनता दल सेक्युलर पक्षातर्फे मंदिर पर्यटनाची योजना देण्यात येणार असल्याचे रायगड जिल्हा चिटणीस विजय खारकर यांनी सांगितले. मंदिरांच्या अर्थकारणाचा फायदा सर्वसामान्यांना झाला पाहिजे, असे सांगितले.
रसायनी: कोरोनामुळे आपणाकडेही मार्च २०२० पासून लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर जवळ-जवळ आठ महिने सर्व धर्मियांची प्रार्थास्थळे बंद होती. मंदिराच्या पुजारी किंवा देखभाल करणाऱ्याव्यतिरिक्त सामान्य नागरिकांसाठी देवदर्शन बंद होते. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे अटी/ शर्तीनुसार उघडण्यास सरकारने परवानगी दिली.
रसायनी परिसरात गुळसुंदेचे प्राचीन श्री सिद्धेश्वराचे मंदिर,मोहोपाडा येथील रसेश्वर मंदिर, साईबाबा मंदिर,विठ्ठल-रूक्मिणी व हनुमान मंदिर,श्री .दत्त मंदिर,गणेश मंदिर,राम मंदिर आणि चर्च इ.मंदिरे आहेत. तर आपटा व वावेघर येथे मस्जिद आहेत. आठ महिन्यांपासून सर्व भक्तांना देवदर्शनासाठी ही मंदिरे बंद होती.
ही सर्व प्रार्थनास्थळे सुरू होणार असल्याने संबंधित धर्मियांच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वात जास्त आनंद मंदिर
परिसरातील उपहारगृृृृहे, श्रीफळ,मिठाई, रसवंती,फुलांच्या व खेळण्यांच्या दुकानदारांना या
हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाही झाला
आहे.