मधुकर ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्कउरण : गुजरात ते जेएनपीटीदरम्यान एकावर एक दुहेरी रचलेल्या डबल कंटेनर वाहून नेणाऱ्या मालवाहू रेल्वेची बुधवारी (३ मार्च) यशस्वी चाचणी झाली. डबल स्टॅक केलेल्या ड्वार्फ कंटेनरच्या पाच वॅगन बुधवारी दुपारी १ वाजता गुजरात राज्यातील मेहसाणा येथे रवाना झाल्या. जेएनपीटी बंदरातून रेल्वेची कंटेनर वाहतुकीची क्षमता आणखी वाढविण्यासाठी आणि ग्राहकांना मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी एकावर एक दुहेरी रचलेल्या डबल कंटेनर वाहून नेण्याची योजना रेल्वेने आखली आहे. रेल्वेने एकावर एक रचून ठेवण्यात येणाऱ्या कंटेनरची वाहतूक करण्यासाठी कंटेनरची उंची ८ फुटांवरून कमी करून सहा फुटांपर्यंत केली आहे. दोन्ही कंटेनर मिळून उंची चार फूट कमी होणार आहे. यामुळे वाहतुकीसाठी मोडिफिकेशन केलेल्या वॅगनमधून विनाअडथळा कंटेनर मालाची वाहतूक करणे आणखी सुलभ होणार आहे. या डबल स्टॅकड् ड्वार्फच्या एका कंटेनरमधून ७१ टन मालाची वाहतूक होऊ शकते. तसेच ६७ % अधिक मालाची वाहतूक शक्य होणार आहे. यामुळे जेएनपीटी बंदरातून रेल्वे वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार वाढ आहे. त्याचा सर्वाधिक फायदा व्यापारी, ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे रेल्वेनेही रेल्वेद्वारा आयएसओ कंटेनर गाड्यांच्या तुलनेत डबल स्टॅकड् ड्वार्फ कंटेनर गाड्यांसाठी अतिरिक्त मालवाहतुकीसह मालवाहतूक शुल्कात १७ % सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. जेएनपीटी बंदरात ‘डेडिकेटेड ड्वार्फ कंटेनर डेपो’चे (डी-डेपो) व्यवस्थापन, देखभाल व संचालन करण्यासाठी ऑपरेटरची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या डेपोमध्ये आयएसओ एक्झिम कंटेनर डिस्टफ़्ड/रीस्टफ़्ड केले जातील आणि नंतर जेएनपीटीकडे किंवा जेएनपीटीतून बाहेर रेल्वेने पाठविण्यासाठी ड्वार्फ कंटेनरमध्ये पुन्हा रीस्टफ़्ड केले जातील. मेहसाणात पुन्हा घेतलेली चाचणीही झाली यशस्वीबुधवारी गुजरातमधील मेहसाणा ते जेएनपीटी बंदरापर्यंत डबल स्टॅकड् ड्वार्फ कंटेनर ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डबल स्टॅकड् ड्वार्फ कंटेनरच्या पाच वॅगनसह ट्रेन सकाळी ११.३० वाजता जेएनपीटी बंदरात दाखल झाली व दुपारी १ वाजता परत रवाना झाली. या वेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच जेएनपीटीचे विविध विभागांचे प्रमुख अधिकारी राजन गुरव, नितीन बोरवणकर, संजीव कुमार व इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.
जेएनपीटीत डबल कंटेनरची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 12:10 AM