पाली : येथील एसटी स्थानकाची इमारत जुनी झाल्यामुळे इमारतीच्या बीमचे वीट बांधकाम आणि प्लास्टर खाली पडण्याच्या घटना सतत घडत आहेत. याचा पाठपुरावा करूनही महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. रविवारी रात्री अकरा वाजता आतील एका बीमचा काही भाग अचानक पडला. त्यातील विटा व प्लास्टर खाली पडले. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.महाराष्ट्रातील अष्टविनायकांचे तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वर म्हणून पाली हे प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक गणेशभक्त येथे येतात. तालुक्यातील अनेक भागातून पाली येथे येणारे विद्यार्थी व तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांमुळे पालीच्या बस स्थानकावर गर्दी असते. यामुळे एसटी महामंडळाला येणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. असे असूनही इमारत दुरु स्ती करण्यासाठी महामंडळ दुर्लक्ष करीत आहे. आता येणाऱ्या गणपती सणासाठी हजारो गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने धोकादायक इमारतीकडे लक्ष देऊन प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत अनेक वेळा महामंडळाचे विभागीय नियंत्रक व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी भेटी देऊन ही पाहणी केली. मात्र ही फक्त कागदावरच राहिली, त्यात इमारतीची कोणतीही दुरु स्ती झालेली नाही. इमारतीच्या बांधकामाचा कोणतातरी भाग हा पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, असे भाजपाचे कार्यकर्ते धनंजय चोरघे यांनी सांगितले.इमारतीच्या पडझडीमुळे काही जीवित हानी झाली तर त्यास एसटीचे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा चोरघे यांनी यावेळी दिला. (वार्ताहर)
पाली बसस्थानकाची पडझड
By admin | Published: September 14, 2015 4:04 AM