महाड : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रभारी प्रचार्य डॉ. प्रकाश कडलग यांच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा जोपर्यंत मागे घेतला जात नाही, तोपर्यंत महाविद्यालयाचे सर्व कामकाज बंद करण्याची भूमिका या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी घेतली आहे. गुरु वारी तसे निवेदनच या प्राध्यापकांनी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिले.गेल्या काही दिवसांपासून या महाविद्यालयात प्रचार्यपदावरून वाद सुरू आहेत, त्यामुळे या महाविद्यालयातील प्राचार्य दालन रिसिव्हरच्या ताब्यात देण्यात आले होते. सध्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कोणीच कार्यरत नसल्याने शिक्षण उपसंचालक आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सेवाज्येष्ठता आणि अर्हता विचारात घेऊन याच महाविद्यालयातील प्रध्यापक डॉ. प्रकाश कडलग यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती केली आहे. २२ जानेवारी रोजी त्यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. ते गुरु वार, २३ जानेवारी रोजी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत महाविद्यालयात जात असताना प्रा. डॉ. कडलग यांच्या काही माणसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार महेंद्र घारे या व्यक्तीने महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर शहर पोलिसांनी प्रा. कडलग यांना सकाळपासून पोलीस ठाण्यात बसवून त्यांची चौकशी केली. त्यांच्या सहकारी प्राध्यापकालाही पोलीस महाविद्यालयातून घेऊन गेले. या प्रकारामुळे महाविद्यालयातील प्राध्यापकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर या महाविद्यालयातील प्रत्येक प्राचार्य तुरुंगातच जाणार असेल आणि आम्हालादेखील दहशतीच्या वातावरणातच काम करावे लागणार असेल, तर आम्हाला काम करणे अशक्य आहे, अशी भूमिका या प्राध्यापकांनी घेतली आहे. आज या सर्व प्राध्यापकांनी प्रंताधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेत आम्ही दहशतीच्या वातावरणात काम करू शकत नाही, अशी भूमिका घेत, महाविद्यालयाचा दैनंदिन कामकाज आजपासून बंद करीत असल्याचे निवेदन दिले आहे.या प्रकरणातून मार्ग काढण्याचे आश्वासन प्रांताधिकारी इनामदार यांनी दिले आहे. मात्र, जोपर्यंत प्रभारी प्राचार्य डॉ. कडलग यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत महाविद्यालयातील कामकाज सुरू करणार नाही, यावर प्राध्यापक वर्ग ठाम आहे.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्यपदाचा वाद : प्राध्यापकांनी पुकारला बेमुदत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 1:32 AM