डॉ.आंबेडकर समाज जोडणारे महामानव
By admin | Published: March 21, 2017 02:08 AM2017-03-21T02:08:09+5:302017-03-21T02:08:20+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हणविरोधी कधीच नव्हते, स्पृश्य-अस्पृश्यांमधील दरी संपुष्टात आणण्यासाठीच
महाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हणविरोधी कधीच नव्हते, स्पृश्य-अस्पृश्यांमधील दरी संपुष्टात आणण्यासाठीच डॉ. आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाज जोडणारेच महामानव होते, असे उद्गार रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.
चवदार तळे सत्याग्रहाच्या ९० व्या वर्धापन दिनी ते महाडमध्ये बोलत होते. ज्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले त्या ऐतिहासिक क्रांतीस्तंभ परिसराच्या सुशोभीकरणासाठी व विकासासाठी ही जागा नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे निर्णय घेण्यात येईल. याबाबत येत्या काही दिवसात नगरपरिषदेच्या प्रशासनासोबत बैठक घेतली जाईल, असेही रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्रातील मोदी सरकार दलित विरोधी आणि घटना बदलू पाहत असल्याचा विरोधकांच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. उलट संपूर्ण देशात जातीधर्मांमध्ये आर्थिक व सामाजिक समतोल राखण्याची भूमिका मोदी सरकारची असल्याचे रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितले. या धोरणामुळेच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकीचे ठरवीत भाजपाने तीनशे पंचवीस जागा जिंकल्या. महाराष्ट्रात आणि देशभरात नोटाबंदीचा निर्णय सामान्य जनतेला मान्य असल्याचे हे द्योतक असल्याचेही आठवले यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा कायम अन्यायाविरोधात होता. त्यांच्या आंदोलनात बहुजन समाजासह ब्राम्हण समाजातील व्यक्तीही सहभागी होत असत. त्यांनी डॉ. आंबेडकर हे ब्राम्हण विरोधी होते, हा गैरसमज असल्याचे आठवले यांनी सांगितले. आजही देशातील अनेक ठिकाणी सामाजिक विषमता आहे. डॉ. बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून आज ९० वर्षे लोटली तरी देशातील ही सामाजिक विषमता संपुष्टात आलेली नाही. याबाबत आठवले यांनी खंत व्यक्त केली. मात्र चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या शंभराव्या वर्धापन दिनापर्यंत येत्या दहा वर्षांत या सामाजिक विषमतेचा पूर्णपणे नायनाट होईल असा विश्वासही यांनी व्यक्त केला.
रामदास आठवले यांचे मिरवणुकीने चवदार तळे येथील स्मारकात आगमन झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, एकच साहेब बाबासाहेब आदि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आठवले यांनी चवदार तळे व क्रांतीस्तंभ येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
या वेळी रायगड जिल्हा रिपाइंचे अध्यक्ष जगदीश गायकवाड, तालुकाध्यक्ष मोहन खांबे आदी उपस्थित होते. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. (वार्ताहर)
राष्ट्रीय महामार्गावर उसळला जनसागर-
दासगाव : चवदार तळे सत्याग्रह दिवस म्हणजे जगाच्या पटलावरती महाड शहराची समतेची ओळख आहे. २० मार्च चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशातून आंबेडकरी जनता महाडच्या चवदार तळ्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. चवदार तळे सत्याग्रह दिवसाला एखाद्या जत्रेसारखे स्वरूप सोेमवारी प्राप्त झाले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातून नागरिक आल्याने मुंबई-महाड येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता.
१९ मार्चपासूनच या चवदार तळ्यावर गर्दीला सुरुवात झाली. २० मार्च रोजी सकाळपासूनच महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरू झाली. मात्र दुपारनंतर या वाहतुकीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होऊन संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग गजबजून गेला होता. यामुळे चवदार तळ्यापासून महामार्ग तसेच आजूबाजूच्या १५ किमी अंतरापर्यंत निळे वादळ दिसून येत होते. महामार्गाने येणाऱ्या जनतेला कोणत्याही तऱ्हेचा वाहतुकीचा त्रास होवू नये यासाठी माणगाव, इंदापूर, लोणेरे महाडच्या महामार्गावर नातेखिंड या ठिकाणी अंतर्गत येणाऱ्या पोलीस चौकीने बंदोबस्त ठेवला होता. यामुळे महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण न होता वाहतूक सुरळीत होती. (वार्ताहर)