रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप अनेकजण बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य सुरूच आहे. दरम्यान, या दुर्घटनेत बचावलेल्या काही मुलांनी त्यांचे आई-वडील गमावले आहेत. या मुलांचे पालकत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने स्वीकारणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हणाले, "ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत. शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे."
याचबरोबर, "समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे. हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी देखील २०२० मध्ये महाड येथील तारीक गार्डन या दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावलेल्या दोन लहान बालकांचे संपूर्णता पालकत्व स्वीकारले होते. दरम्यान, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज सकाळी इर्शाळगड येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा १८ वर्षापर्यंतच्या मुलांचे पालकत्व स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे. तसेच नीलम गोऱ्हेंनी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधला आणि पावसाळी अधिवेशनानंतर पुन्हा याठिकाणी येण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.