लोकमत न्यूज नेटवर्क मोहोपाडा : मेंढपाळ हे पावसाळा ऋतूचे चार महिने सोडले तर उर्वरित महिने जिकडे बकऱ्यांसाठी चारा पाणी मिळेल तिकडे कुटुंबासह भटकंती करत फिरत असतात. असेच काही मेंढपाळ दरवर्षी तालुक्यातील खेड्यापाड्यात येऊन राहत असतात. बाका प्रसंग आला असता डाॅक्टर सुनील ढवळे, जगदिश दगडे यांनी मदत केल्याने ते देवदूत ठरले बारामती येथील मूर्ती गावातील मेंढपाळ भीरु दगडू गलांडे (४०) हे ही आपल्या कुटुंबासह आंबोट या गावाबाहेरील माळरानावर राहत होते. मेंढ्यांना रानात चरण्यासाठी घेऊन गेले असता त्यांच्या दोन लहान मुलांनी सुप्रिया (८) व साहिल (६) यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी मित्र वसंत सदार यांच्या मदतीने मुलांना कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. परंतु, अत्यावस्थ असलेल्या मुलांवर कडाव केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करण्यास असमर्थता दर्शवली व मुलांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने देखील रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे कारण सांगून मुलांवर उपचार करण्यास नकार दिल्याने त्यांनी मुलांना अनेक खासगी दवाखान्यात नेऊन उपचार करण्याची विनंती केली. परंतु, खासगी दवाखान्यातील डाॅक्टरांनी ही त्यांच्या मुलांवर उपचार करण्यास नकार दिला. दरम्यानच्या काळात मुलांची तब्येत अधिकच बिघडत चालली होती आणि मुलांवर उपचार करण्यास कुणीही डाॅक्टर तयार होत नसल्यामुळे ते मुलांना घेऊन श्रीराम पुलावर रडत बसले होते व मुले वेदनेने विव्हळत लोळत पडली होती. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते जगदिश दगडे श्रीराम पुलावरून जात असताना त्यांनी मुलांची होत असलेली तडफड पाहून मेंढपाळ भीरु गलांडे यांची विचारपूस केली त्यांनी विलंब न करता डाॅक्टर सुनील ढवळे यांना संपर्क करुन सर्व हकिकत सांगितली.
वाचले मुलाचे प्राणजगदिश दगडे यांनी नरेश बोरकर व भालिवडे यांच्या मदतीने मुलांना घेऊन डाॅक्टर ढवळे यांच्या हाॅस्पिटलमध्ये धाव घेतली. मुलांना हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डाॅक्टर सुनील ढवळे व त्यांच्या पत्नी डाॅक्टर ईश्वरी ढवळे यांनी मुलांवर तातडीने उपचार करुन दोन्ही मुलांचे प्राण वाचवले. रात्र झाल्यामुळे बाजारपेठेतील सर्व मेडिकल बंद होते परंतु अनुज सुरेश गायकवाड यांनी मेडिकल उघडून औषधे त्वरित उपलब्ध करून दिली.