डॉ. सुहास माने यांची दोन तास चौकशी ; अटक पूर्व जामिनासाठी अर्ज
By राजेश भोस्तेकर | Published: May 22, 2023 01:00 PM2023-05-22T13:00:48+5:302023-05-22T13:01:01+5:30
रायगड पोलीस भरती जिल्हा रुग्णालयातील खंडणी प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने याचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
अलिबाग : रायगड पोलीस भरती जिल्हा रुग्णालयातील खंडणी प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने याचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. डॉ. माने यांनी लेखी म्हणणे दिले असून त्याची दोन तास चौकशी करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात अटक होऊ नये यासाठी डॉ सुहास माने यांनी अटक पूर्व जामीनसाठी अर्ज केला आहे. डॉ माने यांना पुन्हा चौकशी साठी बोलावले जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी सांगितले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या प्रदीप ढोबळ यांचीही आज पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यालाही दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
रायगड पोलीस दलातील पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी १० मे पासून जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू झाली आहे. १५ मे रोजी १५ महिला उमेदवार याना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील लिपिक प्रदीप ढोबळ याने पैशाची मागणी उमेदवार यांच्याकडे केली होती. या प्रकरणात प्रदीप ढोबळ याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल होऊन तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
खंडणी प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने हे सुध्दा संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. डॉ माने यांना चौकशीला येण्यासाठी पोलिसांनी समन्स दिले होते. मात्र या प्रकरणानंतर माने हे किरकोळ रजेवर गेले होते. माने हे रजेवरून आल्यानंतर पोलीस चौकशीला सामोरे गेले. उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी त्याची चौकशी केली. डॉ. माने यांनी आपले लेखी म्हणणे पोलिसांकडे सादर केले आहे. दोन तास माने यांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली.
खंडणी प्रकरण शेकणार याची कल्पना असल्याने डॉ माने यांनी आधीच अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. माने याची पुन्हा चौकशी होणार आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अटक असलेला आरोपी प्रदीप ढोबळ याने चौकशीत काय सांगितले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. सोमवारी ढोबळ याची पोलीस कोठडी संपणार असल्याने त्याला न्ययलायत हजर केले जाणार आहे.