पनवेल : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून, या पुतळ्याच्या सभोवताली संसद भवनाची प्रतिकृती उभारली जाणार आहे. १४ एप्रिलपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस असून, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी बुधवारी येथील कामाचा आढावा घेतला.
पनवेल शहरात १९९१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उभारणी करण्यात आली. पनवेल शहरात पनवेल बसस्थानक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. १९९१ साली रिपाइं नेते रामदास आठवले यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर शिवाजी पुतळ्याप्रमाणेच आंबेडकर पुतळ्याचे सशोभीकरण करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी केली होती. आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरणाच्या मागणीला मान्यता देऊन ५५ लाखांची तरतूद करण्यात आली. बुधवारी या कामाची पहाणी शहर अभियंता संजय कटेकर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अभियंता सुधीर साळुंखे यांनी केली. संसद भवनाची प्रतिकृती तयार करून त्यावर आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात येणार आहे.
शहरातील शिवाजी पुतळ्याचे केलेले सुशोभीकरण अत्यंत विलोभनीय आहे. त्याच धर्तीवर बाबासाहेबांचे पुतळ्याचे सुशोभीकरण होणार असून, संसद भवनासह महाड चवदार तळे सत्याग्रहाचे तैलचित्र याठिकाणी रेखाटण्यात येणार आहे.