मिलिंद अष्टीवकर / रोहातालुक्यात सोमवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहावयास मिळाले. वरसे जिल्हा परिषद मतदारसंघातून उभ्या असलेल्या आदिती तटकरे बिनविरोध निवडून येणार, अशी चर्चा सुरू होती. त्यातच मनसेच्या रेखा खरीवले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर वर्षा देशमुख यांनीही डमी अर्ज मागे घेतला, तर प्राची मोरे यांनी अर्ज मागे घेतल्यावर शेकाप व राष्ट्रवादी आघाडीतील अंतर्गत दुरावा कमी झाल्यावर राजश्री सानप यांनी अर्ज मागे घेतला. तेव्हा राष्ट्रवादी, भाजपा व सेना अशी तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले; पण सेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या पत्नीचा अर्ज मागे घेतल्याचे कळताच सर्व शिवसैनिकांना धक्का बसला. तर दुसरीकडे भाजयुमोचे तालुका अध्यक्ष लोकशाहीतील सर्व डावपेचांना सामोरे जात त्यांच्या पत्नीचा अर्ज कायम ठेवत पक्षाच्याप्रति निष्ठेचे दर्शन दाखवले.शेकाप-राष्ट्रवादी आघाडी असूनही आस्वाद पाटील यांनी बंडखोरी करत पक्षाचे आदेश झुगारले. या बंडखोरीमुळे थेट राष्ट्रवादीचे रोहा तालुका अध्यक्ष मधुकर पाटील यांची जागा धोक्यात आली. तरीही पक्षाची भूमिका म्हणून मधुकर पाटील यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवत पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप, भाजपा यांच्या अशा घडामोडी चालू असताना सव्वाशे वर्षांची दीर्घ परंपरा असलेला काँग्रेस आपली नागोठण्यातली क्षमता ओळखून तिथे रिंगणात आहे. त्याचबरोबर तालुका अध्यक्ष सुनील देशमुखांच्या पत्नीही रिंगणात आहेत. जिल्हा व राज्य पातळीवरून महाड, पेण, अलिबागच्या तुलनेत कमी पाठबळ मिळत असले, तरीही काँग्रेसजनांनी निवडणुकीत उतरण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. नेतृत्वावर, पक्षनिर्णयावर विश्वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते असले, तरी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मानाने आणि धनाने मोठे झालेले नेते नाहीत याचे चित्र रोह्यात पाहवयास मिळाले.
रोह्यात नाट्यमय घडामोडी
By admin | Published: February 15, 2017 4:47 AM