जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 02:23 AM2018-08-05T02:23:01+5:302018-08-05T02:25:02+5:30
जिल्ह्यात मोकाट आणि आक्रमक कुत्र्यांच्या झुंडी जवळपास प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात दिसून येत आहेत
- जयंत धुळप
अलिबाग : जिल्ह्यात मोकाट आणि आक्रमक कुत्र्यांच्या झुंडी जवळपास प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात दिसून येत आहेत, त्यामुळे रात्री उशिराने प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यात तब्बल ११ हजार ५७८ नागरिकांना श्वानदंश झाला आहे. यावर जिल्हा प्रशासन वा स्थानिक यंत्रणांकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत, त्यामुळे जिल्ह्यात श्वानदंशाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
गुरुवारी खालापूर तालुक्यातील चौक गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच वेळी तब्बल १२ जणांवर हल्ला केला. यात पिंकी परशुराम वाघमारे (४६), रामी पांडुरंग चौधरी (३५), यमुना रघुनाथ कदम (६१) आणि राधाबाई किसन सोनावणे (६५), या चार महिला अत्यंत गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका लहान मुलासह उर्वरित जखमींवर चौक येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. जवळपास दोन तास अत्ंयत आक्रमकपणे धुडघूस घालून, १२ जणांना चावलेल्या कुत्र्याला अखेर ठार मारल्यावर ग्रामस्थांनी नि:श्वास टाकला. गेल्या दोन वर्षांपूर्वी दिवसाढवळ्या घरात घुसून एका बालकाचे मोकाट कुत्र्याने लचके तोडल्याचा प्रसंग घडला होता. प्राणी संरक्षणाकरिता असलेल्या ‘पेटा’कायद्यामुळे मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारणे, हा जरी गुन्हा असला तरी माणसाला स्वत:चा जीव वाचविण्याकरिता अशा प्रकारचे पाऊल उचलावे लागले आहे.
श्वानदंश झाल्यावर जी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय येथे उपचार केले जातात, तीच आरोग्य केंदे्र जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची आश्रयस्थाने झाली असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, प्रसंगी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनाही कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरावे लागते. जिल्हा सरकारी रुग्णालयात रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्ती जाऊच शकत नाही. कारण रुग्णालयाच्या अपघात कक्षासमोरच्या मोकळ्या जागेत १५ ते २० कुत्रे वावरत असतात आणि नवीन माणूस पाहिला की जोरजोरात भुंकतात.
>मोकाट कुत्र्यांना विष घालणे वा त्यांच्या बंदोबस्त करणे ही जुनी पद्धत आता ‘पेटा’या कायद्यांतर्गत करता येत नाही. नगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम अलिबाग नगरपालिका क्षेत्रात एकदा राबविली होती; परंतु ती पुरेशी नाही. निर्बीजीकरणाची मोहीम किमान तीन महिन्यांतून एकदा होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकरिता सद्यस्थितीत कोणतीही उपाययोजना नाही.
- महेश चौधरी, प्रमुख, जिल्हा नगरपालिका प्रशासन
>शहरात मोकाट कुत्र्यांना सहज उपलब्ध होणारे अन्न, विशेषत: चिकन, मटण आदीमुळे या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण शहरीभागात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जेव्हा त्यांना हे अन्न उपलब्ध होत नाही, त्या वेळी ते एकमेकांवर हल्ले करू लागतात. त्याच दरम्यान कोणी माणूस आसपास आल्यास ते संघटितरीत्या त्या माणसावर हल्ले चढवतात, असे अनुभवास येते. परिणामी, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाता येतील असे पदार्थ पडणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- गंगाधर सावंत, ज्येष्ठ नागरिक
>कुत्र्यांना आवरण्यासाठी आता ‘अॅनिमल ट्रॅप’
जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीत भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. मोकाट कुत्रे रुग्णालयांच्या इमारतीमध्ये येऊ नयेत, याकरिता ‘अॅनिमल ट्रॅप’ ची योजना अमलात आणण्यात येत आहे. त्याकरिता एक लाख रुपयांचा निधी देखील आला आहे. ‘अॅनिमल ट्रॅप’अंतर्गत फिरते रोलर्स रुग्णालय इमारतीच्या प्रवेशद्वाराला लावण्यात येतील, त्यांस घाबरून कुत्रे रुग्णालयाच्या इमारतीत येणार नाहीत. ‘अॅनिमल ट्रॅप’अलिबागसह माणगाव, पेण, महाड आदी ठिकाणच्या सरकारी रुग्णालयांत येत्या महिन्याभरात बसविण्यात येतील.
- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक