दारु पिऊन वाहन चालविणे पडणार महागात!
By निखिल म्हात्रे | Published: October 15, 2023 07:51 PM2023-10-15T19:51:07+5:302023-10-15T19:55:39+5:30
रायगड जिल्ह्यातील वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत दर दिवशी वाहन चालकांची तपासणी केली जाते.
अलिबाग - वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करीत दारु पिऊन वाहन चालविणे आता महागात पडणार आहे. जिल्हा वाहतूक शाखेने जानेवारीपासून आतापर्यंत 51 जणांविरोधात कारवाई केली आहे. यातील 44 जणांचे चालक परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे बेशिस्त चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यातील वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत दर दिवशी वाहन चालकांची तपासणी केली जाते. हेल्मेट नसणे, वाहन वेगात चालविणे, ज्यादा प्रवासी वाहतूक करणे अशा नियमभंगाबद्दल कारवाई केली जाते. तरुणाईमध्ये दारु पिऊन वाहन चालविण्याचे फॅड जिल्ह्यात वाढू लागले आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या मद्यधुंद वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने जानेवारी ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 51 जणांविरोधात कारवाई केली. त्यांच्याविरोधात न्यायालयात खटले दाखल केले. त्यापैकी 44 जण दोषी आढळून आल्याने त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही जिल्हा वाहतूक शाखेने सुरु केली आहे. त्यांचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला आहे.
दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या 44 जणांचे चालक परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाला पाठविला आहे. दारु पिऊन वाहन चालवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
- अनिल लाड, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड