ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:02 AM2019-05-18T00:02:55+5:302019-05-18T00:04:36+5:30

यावर्षी पाणीटंचाईची समस्या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.

 Drinking water problem in rural areas; Peept | ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

Next

- संतोष सापते

श्रीवर्धन : नळाला येणारे पाणी बंद झाले...दैनंदिन कामासाठी पाणी तर लागतेच...पाणी अणण्यासाठी पायपीट करावी लागते...जेथे पाणी उपलब्ध होईल तेथे जावे लागते...गालसुर येथे बोअरवेलला पाणीच नाही...एकच विहीर पाणी आणण्यासाठी उपलब्ध आहे येथेही मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी गर्दी होते, त्यातून जसे पाणी उपलब्ध होईल असे आणावे लागते...हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत सध्या करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया रचना नादिवकर या गालसुरे येथील महिलेने दिली आहे.
यावर्षी पाणीटंचाईची समस्या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वावे, धनगरमलई, गुलधे, बापवली, साक्षीभैरी या गावांना तालुका प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे, परंतु तालुक्यातील इतर गावाचा प्रश्न उत्तरोत्तर बिकट बनत आहे. नियमित रोजंदारीवर काम करून उपजीविका चालवणाऱ्या लोकांना पाण्यासाठी रोजगार बुडवावा लागत आहे. घरातील लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे असे चित्र सध्या श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पहावयास मिळत आहे. पारंपरिक जलस्रोत असलेल्या विहिरीच्या पाण्याने तळ गाठले आहेत, विंधनविहिरी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यात अयशस्वी ठरत आहेत , गावातील जुने हातपंप जास्तीत जास्त नादुरुस्त आहेत. सुव्यवस्थित हातपंप अशुद्ध पाणीपुरवठा करत आहेत त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दिवस व रात्री लोकांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामीण भागात नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे .
कोकणाच्या लाल मातीचा पोत बघता तिची पाणी साठवण क्षमता कमी आहे. निसर्गत: कोकणात भरपूर पाऊस पडतो, परंतु राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत कोकणात जलस्रोत साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी सरकार उदासीन असल्याचे दिसून येते. धरण, बंधारे यांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. श्रीवर्धन तालुक्यात रानवली, कुडकी या दोन धरणाचा अपवाद वगळता इतर सरकार निर्मित स्रोतांचे प्रमाण फारच कमी आहे. बापवन, गालसुरे, निगडी, सायगाव, आडी, धारवली, मेघरे, हुन्नरवेली, वेळास, भरणा, वांजळे, दिघी, सर्वा, आदगाव, वडघरपांगळोली, गडबवाडी, मोहितेवाडी व कोलमांडला या ग्रामीण भागातील गावातील पाणीप्रश्न बिकट बनला आहे .
हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धन येथील पर्यटन व्यवसायाला दुष्काळाच्या झळा पोहचत आहेत. धनगरमलई, वावे, नागलोली, गुलधे या गावांचा पाणीप्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. सरकारी यंत्रणेच्या विविध अभियान व उपक्रमांची दिशा व दशा यांचे चिकित्सक अवलोकन आणि परीक्षण अगत्याचे आहे, अन्यथा आगामी काळात संबंधित गावांचा प्रश्न अधांतरी राहील. ग्रामीण भागातील पेयजलाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पशुधन सांभाळणे जिकरीचे ठरत आहे. त्याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे. कोकणातील मान्सून लांबणीवर पडल्यास श्रीवर्धन तालुक्यात दुष्काळ दाह सोसावा लागणार आहे.

दूध उत्पादन घटले
यावर्षी पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी अवघड आहे. दुष्काळामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पयार्याने दूध उत्पादन घटले आहे. जोरदार फटका दूध व्यवसायाला बसला आहे.
- मोतीराम परभळकर, दूध व्यावसायिक, बोर्लीपंचतन

दिवसाआड पाणी
धनगरमलई,वावे,नागलोली या गावाच्या पाणी प्रश्नी सरकारी यंत्रणेकडून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी गावात पाणीप्रश्न निर्माण होतो. टँकरने पाणीपुरवठा हा कायमचा उपाय होऊ शकत नाही त्यासाठी निर्णायक भूमिका सरकारदरबारी घेणे गरजेचे आहे. आम्हाला दिवसाआड पाणी मिळते ते सुद्धा मुबलक प्रमाणात मिळत नाही.
- तृप्ती विचारे, शिक्षिका, नागलोली

पर्यटन व्यवसायाला फटका
यंदा पाणीटंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटक येतात परंतु त्यांना योग्य सोईसुविधा पाण्याअभावी देणे अवघड ठरत आहे. नगरपालिकेकडून एकदिवसा आड पाणीपुरवठा केला जातो. नगरपालिकेने लवकरात लवकर टँकरने पाणी उपलब्ध करावे.
- बाळा वाणी, हॉटेल व्यावसायिक, श्रीवर्धन

पाणी हे जनावरांची देखील मुख्य गरज आहे. आमच्याकडील म्हशी, गायीचे पालन करणे कठीण झाले आहे. त्यांना चारा मिळणे अवघड झाले आहे, यामुळे दूध कमी निघते परिणामी दुधातून मिळणारे पैसे कमी झाले आहेत, यामुळे आर्थिक गणित बिघडले आहे.
- उल्हास चितळे, शेतकरी, श्रीवर्धन

Web Title:  Drinking water problem in rural areas; Peept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड