भान ठेऊन चालवा वाहन, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे प्रतिपादन
By निखिल म्हात्रे | Published: January 25, 2024 05:23 PM2024-01-25T17:23:51+5:302024-01-25T17:24:44+5:30
शाळा, महाविद्यालयांत वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम.
निखिल म्हात्रे,अलिबाग : सध्या मोटारसायकल अपघाताबरोबरच त्यामधील मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गाडी चालवित असताना आपल्या घरी आपले कुटुंब वाट पाहत आहे. हे भान ठेऊन मोटारसायकल चालकाने गाडी चालवावी, असा सल्ला जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला. तसेच यंदा अपघातात २० टक्क्यांनी मृत्युमुखी पडण्याच्या संख्येत घट झाल्याचे सांगत कमीत कमी अपघात होण्यासाठी वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याकडे घार्गे यांनी लक्ष वेधले.
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व महाविद्यालयात वाहतूक सुरक्षा जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले होते. यावेळी घार्गे बोलत होते. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक कर्मचारी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
घार्गे म्हणाले की, जिल्ह्यात सध्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ती थांबविण्यासाठी सध्या वाहतूक विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत महाविद्यालयातील मुलांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. सध्या अल्पवयीन मुले महाविद्यालयात येण्यासाठी मोटारसायकलचा आग्रह करताना दिसत आहेत. तर त्यांचे पालकही मोठ्या उत्साहात त्यांचे हट्ट पुरविताना दिसत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये बेजबाबदारपणा वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी आता वाहतूक विभागाने पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत ते त्यांनी अंगिकारण्याची गरज आहे.
अपघात कमी करण्यासाठी विशेष दक्षता :
जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस वाहतूक शाखेमार्फत विशेष दक्षता घेतली जात आहे. विना हेल्मेट वाहन चालकांवर कारवाई, ड्रंक अँण्ड ड्राइव्ह तापासणी, महामार्गावर चारचाकी गाड्यांचा वेग तपासणे, सीटबेल्ट न लावणाऱ्या चालकांवर कारवाई यासह गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या मोटारसायकलस्वारांवरही कारवाई सुरू आहे. त्यामुळे सध्या अपघातांचे प्रमाण कमी होत असल्याचे जिल्हा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल लाड यांनी सांगितले.