रिक्षात विसरलेली रक्कम चालकाने केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:28 PM2020-10-01T23:28:16+5:302020-10-01T23:28:24+5:30
महापे-शीळफाटा मार्गावरची घटना : जनार्दन वावले यांचा प्रामाणिकपणा
नवी मुंबई : रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षात हरवलेली ८ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स एका प्रवाशाला सुखरूप परत मिळाली. हा प्रकार मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडला. रिक्षाचालक जनार्दन वावले यांच्यासह महापे ते शीळफाटा असा रिक्षा व्यवसाय करणाऱ्या ठाणे जिल्हा आॅटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने या प्रवाशाचा शोध घेण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली.
रिक्षाचालक जनार्दन श्रीरंग वावले (रा. शीळगाव, सावित्रीनगर) यांच्या रिक्षात मंगळवारी दुपारी महापे - शीळफाटा या मार्गावरून एक प्रवासी रिक्षात बसला. इच्छित स्थळी तो उतरून गेला. या रिक्षाचालकाने सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी रिक्षा उभी केली असता अचानक त्यांची नजर रिक्षाच्या मागील सीटवर असलेल्या पर्सकडे गेली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ठाणे जिल्हा रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे विभाग अध्यक्ष विनोद वासकर यांच्याशी संपर्क साधून रिक्षाचालकांच्या उपस्थितीत ८ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स ज्या प्रवाशाची विसरलेली होती, त्याचा शोध घेत त्याला परत करून माणुसकीचे दर्शन घडविले. ज्या प्रवाशाचे ८ हजार रुपये रोख, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि काही वस्तू खरेदी केल्याची बिले आदी महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स प्रामाणिकपणे प्रवाशाला परत करण्यात आली.
१७ सप्टेंबर रोजी रिक्षाचालक जनार्दन वावले यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर ते मंगळवारी पहिल्याच दिवशी रिक्षा व्यवसायाला निघाले असताना हा प्रकार घडला.