द्रोणागिरी किल्ला मोजतोय अखेरची घटका, ओएनजीसीच्या बंधनांमुळे किल्ल्याची डागडुजी अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:03 AM2020-10-31T00:03:03+5:302020-10-31T00:04:24+5:30

Dronagiri fort News : रायगड जिल्ह्यातील उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आहे. डोंगरमाथ्यावर किल्ला तर डोंगराच्या पायथ्याशी कोळी-आगऱ्यांच्या द्रोणागिरी देवीचे स्थान आहे.

Dronagiri fort is counting the last Minutes In Uran | द्रोणागिरी किल्ला मोजतोय अखेरची घटका, ओएनजीसीच्या बंधनांमुळे किल्ल्याची डागडुजी अशक्य

द्रोणागिरी किल्ला मोजतोय अखेरची घटका, ओएनजीसीच्या बंधनांमुळे किल्ल्याची डागडुजी अशक्य

Next

- मधुकर ठाकूर 
उरण : सोळाव्या शतकातील देवगिरीच्या यादव राजवटीतील उरणच्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर असलेला ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला कायमच दुर्लक्षित राहिला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी ओएनजीसी असल्याने पुरातन विभागही या किल्ल्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे असंरक्षित राहिलेल्या द्रोणागिरी किल्ल्याचा ऐतिहासिक दुर्मीळ ठेवा पडझडीमुळे दृष्टिआड होण्याच्या मार्गावर आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आहे. डोंगरमाथ्यावर किल्ला तर डोंगराच्या पायथ्याशी कोळी-आगऱ्यांच्या द्रोणागिरी देवीचे स्थान आहे. उरण तालुक्यातील करंजा गावाजवळ असलेला किल्ला ऐतिहासिक काळापासूनच महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. सोळाव्या शतकातील देवगिरीच्या यादव राजवटीतील किल्ल्याची १५३० मध्ये पोर्तुगीज लोकांनी डागडुजी केली. १५३५ मध्ये अँटोनो-डे-पोर्टो यांनी नोसा सेन्होरा, एन.एस.डी. पेना आणि सॅम फ्रान्सिस्को या तीन चर्च बांधले. १६ व्या शतकात हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला. १० मार्च, १७३९ रोजी हा किल्ला मनाजी आंग्रे यांनी ताब्यात घेतला. या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष आजही गडावर दिसतात. तेथे एक चर्च आहे. येथे असलेल्या मूर्ती शिलालेखशिवाय आहेत. चर्च आतल्या तटबंदीमध्ये आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा चर्चच्या दक्षिणेस ५० मीटर अंतरावर आहे. गेटची कमान तुटलेली आहे. संरक्षकांच्या खोल्यांचीही स्थितीही दयनीय आहे. गल्लीच्या दगडावर कोरलेला गणपती एका संरक्षक कक्षात ठेवला आहे. दयनीय झालेल्या अवस्थेत वेताळ मंदिर आहे.

या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी ओएनजीसी प्रकल्प आहे. प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी या डोंगरावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा सशस्त्र पहारा आहे.
द्रोणागिरी किल्ल्याची नोंद राष्ट्रीय राज्य संरक्षित स्मारकातही नोंद नसल्याचे सांगण्यात येत आहे. या किल्ल्यांची एमएमआरडीएने नोंद घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, तेही प्रयत्न विफल ठरले आहेत. येथील ओएनजीसी प्रकल्पांच्या काही बंधनांमुळे पुरातन विभागही या किल्ल्याकडे लक्ष देण्यास राजी नाही. त्यामुळे असंरक्षित राहिलेला द्रोणागिरी किल्ल्याचा ऐतिहासिक दुर्मीळ ठेवा पडझडीमुळे दृष्टिआड होण्याच्या मार्गावर लागला आहे. परिसरातील काही गड, दुर्गप्रेमी संस्थांकडून किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ते पुरेसे नसल्याने राज्य संरक्षित स्मारक विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया गड, दुर्गप्रेमी संस्थेचे सदस्य डॉ.सत्यजीत ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

ओएनजीसीने द्रोणागिरी डोंगर परिसरातील काही भाग सील करून प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात केले आहेत. किल्ल्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुरुस्ती करण्यासाठी आधी असंरक्षित स्मारक संरक्षित करण्याची गरज आहे. या आधीही किल्ल्याची एमएमआरडीएने नोंद घेण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.
    - डॉ. मयूर ठाकरे
    (राष्ट्रीय स्मारक विभागाचे   टेक्निकल असिस्टंट, पुरातत्त्व 
    विभागाचे जनसंपर्क अधिकारी) 
 

Web Title: Dronagiri fort is counting the last Minutes In Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड