अलिबाग : अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली होती. आलेल्या आपत्तीमुळे कोट्यवधी रुपयांची वित्त हानी झाली असतानाच तालुक्यातील एकट्या खारेपाट विभागातील सुमारे ३०० शेततळ्यांचे एक कोटी ७७ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. येथील बांधबंदिस्ती उद्ध्वस्त झाल्याने खाडीचे पाणी शेतात शिरून शेततळी अक्षरश: वाहून गेली आहेत. प्रशासनाला प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करणे शक्य नसल्याने ड्रोन कॅमेºयाच्या साहाय्याने पंचनामा करण्याची मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली आहे. जिल्हा प्रशासनाने याला मान्यता दिल्यास राज्यातील रायगड जिल्हा हा एकमेव जिल्हा ठरण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. जिल्ह्यात साधारणपणे सुमारे तीन हजार २०० मिमी सरासरी पाऊस पडतो, मात्र यावर्षी तब्बल साडेतीन हजार मिमीच्यावर पाऊस पडल्याने पावसानेच आपल्या बरसण्याचा रेकॉर्ड तोडला होता. त्यामुळे नद्या, नाले मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत होते. त्याच कालावधीत समुद्राला उधाण आल्याने साहजिकच पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने पाणी घरांसह शेतांमध्येही घुसले होते. त्यामुळे ठिकठिकाणी कोट्यवधी रुपयांची हानी झाली. शेतीसह घरांचे, गोठ्यांचे झालेले नुकसान याबाबतचा पंचनामा करण्याचे काम प्रशासानाने सुरू केले आहेत. मात्र, शेततळ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासन आणि सरकार अद्यापही उदासीन असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.शेतकऱ्यांनी शेतीसह शेततळीही निर्माण केली आहेत. शेततळ्यातील उत्पादित होणारे मासे विकून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या तयारीत असतानाच निसर्गाने वक्रदृष्टी केली. त्यामुळे शेतात उधाणाचे पाणी शिरून ते शेतीसह शेततळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी घुसून शेततळी पाण्याखाली गेली होती. परिणामी हातातोंडाशी आलेले तळ्यांमधीस मासे वाहून गेले आहेत. तसेच शेततळ्यांचेही नुकसान झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.पावसाचा प्रकोप आणि समुद्राने धारण केलेले रौद्ररूप यामुळे शेतातील बांधबंदिस्ती उद्ध्वस्त झाल्याने तेथे पोचणे मुश्कील झाले आहे. याबाबत प्रशासनाला माहिती आहे किंवा नाही याची आम्हाला माहिती नाही, परंतु आमचे जे नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा हा झालाच पाहिजे. पंचनामा करण्यासाठी तेथे पोचता येत नसेल तर ड्रोन कॅमेºयाचा वापर करून तेथे पोचता येईल. ड्रोन कॅमेºयाच्या साह्याने नुकसानीची गंभीरता कळेल आणि पंचनामाही करणे सोपे होणार आहे. यासाठी प्रशासनाने ड्रोन कॅमेºयाची मदत घ्यावी अशा मागणीचे निवेदन श्रमिक मुक्ती दलाने जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.शेतातील उत्पन्नाबरोबरच शेततळी निर्माण करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यानुसार आम्ही शेततळी निर्माण केली होती, मात्र आलेल्या आपत्तीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी धाकटे शहापूरमधील शेतकरी सुधीर बाळाराम पाटील यांनी केली.उधाणामुळे नुकसानअलिबाग तालुक्यातील मोठा पाडा, शहापूर, धेरंड, धाकटा पाडा येथील सुमारे ३०० तलावांमध्ये अगोदर माशांची पैदास झाली होती, तसेच नव्याने मत्स्य बीज सोडण्यात आले होते. अतिवृष्टी आणि उधाणाच्या पाण्यामुळे ते सर्वच वाहून गेले आहे. सदरचे तलाव रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहेत. हे फक्त या गावापुरते झाले आहे. अशा प्रकारचे तलाव जिल्ह्याच्या कानाकोपºयात उभारण्यात आलेले आहेत. तेथील नुकसानीची गंभीर अधिक असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.हेक्टरी नुकसान - २,९६,०००नुकसानग्रस्त तलाव - ३००आकारमान (सरासरी) - २० गुंठ्यामध्ये एक तलाव उभारण्यात येतो. त्यानुसार ३०० गुणिले २० = ६००० (नुकसानीचे क्षेत्र)२,९६,००० भागिले १०० = २९६० हे एका गुठ्यांचे आर्थिक नुकसान२९६० गुणिले ६,००० = १,७७, ६०,००० (एक कोटी ७७ लाख ६० हजार रुपये) आर्थिक नुकसान झाले आहे.
शेततळ्यांच्या पंचनाम्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 1:43 AM