गणपतीत महामार्गावरील वाहतूककोंडीवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 08:44 AM2024-08-31T08:44:33+5:302024-08-31T08:45:01+5:30

गतवर्षी दोन ड्रोन कॅमेरे होते. यंदा त्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Drone cameras will keep an eye on the traffic jams on the highway in Ganpati | गणपतीत महामार्गावरील वाहतूककोंडीवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

गणपतीत महामार्गावरील वाहतूककोंडीवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांचा यंदा ‘वाहतूककोंडी व खड्डे मुक्त’ प्रवास होईल, असा दावा रायगड पोलिसांनी केला आहे. त्यात वाहतूककोंडी टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून, जीवनावश्यक वस्तूंची वाहने वगळून या काळात इतर सर्व १६ टनांच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. गतवर्षी दोन ड्रोन कॅमेरे होते. यंदा त्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

रायगड जिल्हा शांतता कमिटीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी घार्गे यांनी या तयारीबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रत्येक विभागाचे अधिकारी, शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. 

महामार्गावर चोख बंदोबस्त
- चाकरमान्यांचा प्रवास हा निर्विघ्न व्हावा, यासाठी रायगड पोलिसांचा बंदोबस्तही चोख राहणार आहे. 
- यामध्ये १२ उपविभागीय पोलिस अधिकारी, २८ पोलिस निरीक्षक, ८१ सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ७४२ पोलिस अंमलदार, ५० होमगार्ड यांच्यासह ४० मोटारसायकली, ७२ वॉकीटॉकी, १८ टोकन क्रेन, १८ रुग्णवाहिका, ५८ सीसीटीव्ही तैनात राहणार आहे. महामार्गावर मोटारसायकल पेट्रोलिंगही सुरू राहील. 
- यासाठी ४० मोटारसायकली, १३० अंमलदार, ३० अधिकारी असून प्रत्येक पाच किमी परिसरात त्यांचे लक्ष राहील.

अवजड वाहनांना बंदी
गणेशोत्सव काळात ५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १३ सप्टेंबर ११ वाजेपर्यंत, तसेच १७ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापसून ते १८ सप्टेंबर रोजी रात्री ४ वाजेपर्यंत १६ टन व त्यापेक्षा अधिक अवजड वाहनांना बंदी राहील.

गणेश भक्तांसाठी सुविधा केंद्रे 
खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी, पोलादपूर येथे सुविधा केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये चहापान कक्ष, वैद्यकीय कक्ष, फोटो गॅलरी, पोलिस मदत केंद्र, बालक आहार कक्ष, वाहनतळ, वाहन दुरुस्ती कक्ष तयार केले जाणार आहेत.

फलक नसल्यास कारवाई

रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग हद्दीतील अनेक ठिकाणी दुभाजक आहेत. मात्र, या ठिकाणी सूचना फलक लावले नसल्याने वाहनचालक यांना अडथळा निर्माण होतो. अनेकदा अपघातही होत आहेत. गणपतीपूर्वी दुभाजक ठिकाणी सूचना फलक लावलेत का? याची प्रांताधिकाऱ्यांनी पाहणी करावी. यामध्ये कुचराई झाली आणि अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Drone cameras will keep an eye on the traffic jams on the highway in Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.